अहमदाबाद-
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका २-१ अशा फरकानं जिंकली आणि इतिहास घडवला. दुसरीकडे न्यूझीलंडनं श्रीलंकेला पराभूत केल्यानं भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीचं तिकीट पक्कं झालं आहे. ऑस्ट्रेलिया सीरिज विराट कोहलीसाठी पुन्हा एकदा खूप नशीबवान ठरली. कारण या सीरिजमध्ये कोहलीनं तीन वर्ष आणि तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर कसोटी शतक ठोकलं. सामन्यानंतर कोहलीनं मुलाखतीत 'मन की बात' बोलून दाखवली. तसंच टीकाकारांनाही उत्तर दिलं.
"मी आता अशा ठिकाणी नाही की मी बाहेर जाईन आणि कुणाला चुकीचं सिद्ध करेन. मला हेही सांगण्याची अजिबात गरज वाटत नाही की मी मैदानात का आहे. कारण मी जेव्हा मैदानात ६० धावांवर खेळत होतो तेव्हा आम्ही सकारात्मक खेळ करण्याचं ठरवलं. पण त्यावेळी आम्ही श्रेयस अय्यरला गमावलं होतं", असं विराट कोहली म्हणाला.
"एक खेळाडू म्हणून ज्या अपेक्षा आहेत त्याच माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मला वाटतं कसोटी क्रिकेटमध्ये ज्या गतीनं मी १० वर्षांपासून खेळत होतो त्या गतीनं खेळू शकलो नाही. पण मी प्रयत्न सोडले नाहीत. मला वाटतंय की मी नागपूर कसोटीतील पहिल्या डावापेक्षा चांगली फलंदाजी केली. पण आम्ही संघाच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. ज्या क्षमतेनं मी याआधी फलंदाजी केली आहे त्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर मी निराश होतो. पण मला विश्वास होता की मी चांगलं खेळत आहे आणि चांगली विकेट मिळाली तर मोठी खेळी साकारू शकतो हे इतकंच मला ठावूक होतं", असंही विराटनं म्हटलं.
१०२४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने कसोटी शतक झळकावलं. हे त्याचं कसोटीतील २८वं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७५वं शतक ठरलं. खेळपट्टी सपाट होती, परंतु त्यावर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. कारण स्टीव्ह स्मिथ पूर्णपणे लेग-साइड सील करून त्याच्या गोलंदाजांना विकेटच्या दिशेनं गोलंदाजी करण्यास सांगत होता.