Virat Kohli on Rohit Sharma's Mumbai Indians कित्येक दिवसांपासून फॉर्मच्या शोधात असणारा विराट कोहली गुरूवारच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर तुटून पडला. १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने ५४ चेंडूत ७३ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे RCB चे यंदाच्या Playoffs साठीचे आव्हान जिवंत राहिले. पण आता त्यांचे भवितव्य रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सवर अवलंबून आहे. जर मुंबईने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीला पराभूत केले, तरच RCBला प्ले-ऑफचे तिकीट मिळणार आहे. याचबाबत बोलताना, विराटने सामन्यानंतर अतिशय मजेशीर विधान केले.
विराट कोहलीला सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले. सामन्यानंतर हा किताब स्वीकारताना विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यासोबतच एक मजेशीर विधानही केले. "मी चांगली फलंदाजी करू शकतो हे मला माहिती होतं. आजचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता. पण मी गेले काही दिवस खूपच निराश होतो, कारण माझ्या संघासाठी मला फार काही करता आलं नाही याची मला खंत होती. पण अखेर या सामन्यात मी स्वत:च्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली खेळी करू शकलो याचं मला समाधान आहे", असे विराट म्हणाला.
रोहितच्या मुंबई इंडियन्सबद्दल विराट म्हणाला...
"मुंबईचा सामना शनिवारी आहे. त्यामुळे आता आमच्याकडे वाट पाहण्यावाचून दुसरा पर्याय नाही. आता आम्ही २ दिवस छानपैकी आराम करणार आणि शनिवारी मुंबईच्या संघाला सपोर्ट करणार. आमच्याकडे मुंबईला सपोर्ट करणारे २ अजून सपोर्टर देखील आहेत. पण मला वाटतं की त्या दिवशी केवळ २ जणच नाही, तर २५ च्या २५ खेळाडू मुंबईला सपोर्ट करतील", असं मजेशीर विधान विराटने केलं.
RCB चं भवितव्य मुंबई-दिल्ली सामन्यावर अवलंबून...
विराट माजी कर्णधार असलेल्या RCB संघाचे सध्या १४ सामन्यात १६ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट -०.२५३ आहे. हीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आता यंदाच्या साखळी फेरीच्या सामन्यांपैकी केवळ दिल्लीचा संघ RCB एवढे गुण मिळवू शकतो. दिल्ली कॅपिटल्स सध्या १३ सामन्यांत १४ गुणांवर आहेत. त्यांचा नेट रन रेट +०.२५५ इतका आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने त्यांना पराभूत केलं तरच RCB ला पुढील फेरीचं तिकीट मिळेल. पण दिल्लीचा संघ जिंकला तर RCB थेट स्पर्धेबाहेर जाईल.
Web Title: Virat Kohli says Mumbai Indians will have 25 more supporters on match day against Delhi Capitals also hopes Rohit Sharma will score big IPL 2022 Playoffs RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.