पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर प्रचंड दबाव होता. भारतीय संघ फक्त घरच्या मैदानावर उत्तम खेळू शकतो अशी टीका संघावर होऊ लागली होती. एकदिवसीय मालिकेतून आपल्यावर होणा-या या टिकेला उत्तर देण्याची संधी भारतीय संघाकडे होती आणि संघाने टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. पोर्ट एलिझाबेथमधील पाचवा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघाने सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने संपुर्ण संघाने केलेल्या प्रयत्नांचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. सहावा सामना जिंकता 5-1 ने मालिका जिंकण्याचा निर्धार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. आता आम्ही 2019 वर्ल्डकप लक्षात ठेवून तयारी करत आहोत आणि त्या दिशेने वाटचाल करत आहोत असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
विराट कोहलीने म्हटलं की, 'विजयामुळे मी प्रचंड आनंदी आहे. हे आमची सांघिक कामगिरी होती'. आपल्या संघाने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली असल्याची शाबासकी यावेळी विराट कोहलीने दिली. आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात 100 टक्के कामगिरी केली आहे असंही विराटने सांगितलं. पुढे तो बोलला की, 'या सामन्यात एका संघावर मालिका गमावण्याचा दबाव होता आणि तो दक्षिण आफ्रिका होता. त्यांच्या छोट्या छोट्या चूका आम्हाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी देतील हे आम्हाला माहिती होतं'.
भारताने कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिस-या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे की, 'जोहान्सबर्ग कसोटी सामन्यानंतर आम्हाला खूप चांगला वेळ मिळत आहे. आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळत आहोत आणि हे भारतीय खेळाडूंसोबत सपोर्ट स्टाफ आणि सर्वांच्याच प्रयत्नांचं फल आहे'.
मालिकेत 4-1 ची आघाडी मिळाल्याने आपण अत्यंत आनंदी असल्याचं विराट कोहलीने सांगितलं आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. भारताकडून शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मालिकेत शतक ठोकलं.