ठळक मुद्दे बिकट परिस्थितीत एक बाजू लावून धरत फटकावलेले शतक हे विराटचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले विराट कोहलीने 224 एकदिवसीय सामने आणि 216 डावात 40 शतके पूर्ण करण्याची किमया साधली कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू
नागपूर - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. बिकट परिस्थितीत एक बाजू लावून धरत फटकावलेले शतक हे विराटचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले आहे. त्याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 40 शतके पूर्ण करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रिक केले होते. गोलंदाजांना साथ देणाऱ्या जामठाच्या खेळपट्टीवर इतर फलंदाजांकडून निराशा होत असताना बिकट परिस्थितीमध्ये विराटने खेळपट्टीवर तग धरला. त्याने एक बाजू लावून धरत शतक फटकावले. आजचे शतक हे विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीमधील 40 वे शतक ठरले.
विराट कोहलीने 224 एकदिवसीय सामने आणि 216 डावात 40 शतके पूर्ण करण्याची किमया साधली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानी असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह सर्वाधिक एकदिवसीय शतके फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आहे.
कोहलीचा असाही विक्रम
एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने या सामन्यात जेव्हा 22 धावा पूर्ण केल्या तेव्हा त्याने हा विक्रम रचला. कोहलीने कर्णधार म्हणून कसोटीमध्ये 4815, वनडेमध्ये 3879 (नाबाद 22) आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 606 धावा केल्या आहेत. कोहलीने या नऊ हजार धावा 159 डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर सर्वाधिक सात हजार धावा बनवण्याचा विक्रम होता. लाराने 164 डावांमध्ये या धावा केल्या होत्या.
विराटने आज नोंदवलेले विक्रम
- एकदिवसीय क्रिकेटमधील 40 वे शतक
- आजची शतकी खेळी ही विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सातवी शतकी खेळी
- कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू
Web Title: Virat Kohli scored 40th ODI century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.