Join us  

Virat Kohli, Asia Cup 2022 IND vs AFG: विराट कोहलीला 'बाप्पा पावला'! तब्बल १,०२१ दिवसांनी ठोकलं शतक

भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट आज अखेर घडलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2022 8:56 PM

Open in App

Virat Kohli, Asia Cup 2022 IND vs AFG: भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट आज अखेर घडलीच. विराट कोहलीने तब्बल १ हजार २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज आंतरराष्ट्रीय शतक लगावले. विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत टी२० क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे ७१वे शतक ठरले. विराटने केलेल्या ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत २ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारली. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने देखील दमदार खेळी करत कर्णधारपदाला साजेसे अर्धशतक (४२ चेंडूत ६१ धावा) ठोकले.

अफगाणिस्तानच्या संघाविरूद्ध निव्वळ औपचारिक सामना खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्याने, कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली यांनी सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय एकदम 'हिट' ठरला. रोहितच्या अनुपस्थितीत विराट-राहुल जोडीने शतकी सलामी देत आपापली अर्धशतके पूर्ण केली. विराट कोहलीने आशिया चषकाच्या यंदाच्या हंगामात हाँगकाँग आणि पाकिस्ताननंतर आज तिसरे अर्धशतक ठोकले. तर फॉर्मसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला देखील सूर गवसला. विराटच्या साथीने त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला रोहितची उणीव अजिबात भासू दिली नाही. राहुल ४२ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. त्याने ६ चौकार आमि २ षटकार लगावले. पण विराटने मात्र २० षटके पूर्ण खेळून काढली. त्याने ६१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादव (६) स्वस्तात बाद झाला. पण रिषभ पंतने (नाबाद २०) विराटला शेवटपर्यंत साथ दिली.

भारतीय संघात ३ महत्त्वाचे बदल

भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आधीच आशिया चषक स्पर्धेतून बाहेर फेकले गेले असल्याने भारताने प्रयोग करण्याचा आणखी एक चान्स घेतला. रोहित शर्मा सोबतच हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यां दोघांनाही संघाबाहेर बसवण्यात आले. त्या जागी दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल या तिघांना संघात स्थान देण्यात आले.

भारत- लोकेश राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

अफगाणिस्तान- हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहली
Open in App