नवी दिल्ली - पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा 203 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडवरील या विजयासह विराट कोहलीच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करताना विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेला हा 22 विजय ठरला आहे. त्यामुळे या विजयाबरोबरच सौरव गांगुलीचा 21 कसोटी विजयांचा विक्रम विराटने मागे टाकला आहे. याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटने धोनीपाठोपाठ दुसरे स्थान पटकावले आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार असून, धोनीने 60 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करताना 27 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. तर 18 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. अन्य 15 सामने अनिर्णित राहिले. तर सौरव गांगुलीने 49 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 21 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. तर 13 सामन्यात त्याला पराभव पत्करावे लागले होते. अन्य 15 सामने अनिर्णित राहिले होते. विराट कोहलीची कर्णधार म्हणून या दोघांनाही तोडीस तोड कामगिरी झाली आहे. विराटने आतापर्यंत 38 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्यापैकी 22 सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर केवळ 7 सामन्यात भारताचा पराभव झाला असून, 9 सामने अनिर्णित राहिले आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत भारताने दणदणीत विजय मिळवून कसोटी मालिकेतील आपली पिछाडी 1-2 अशी कमी केली आहे. विराट कोहलीची धमाकेदार फलंदाजी आणि हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा व मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी भारतीय संघाच्या विजयात निर्णायक ठरली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India VS England : तिसऱ्या कसोटीतील विजयासह विराटने मोडला गांगुलीचा हा विक्रम
India VS England : तिसऱ्या कसोटीतील विजयासह विराटने मोडला गांगुलीचा हा विक्रम
भारतीय संघाच्या नॉटिंगहॅम कसोटीतील विजयासह विराट कोहलीच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 5:35 PM