विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये जरी खोऱ्याने धावा केल्या, तरी त्याचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे शक्य नाही. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती आणि संघ व्यवस्थापन विराटला जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघात घेण्यात इच्छुक नाहीत. ट्वेंटी-२० सारख्या फॉरमॅटमध्ये विराट संघाची गजर पूर्ण करत नसल्याचे व्यवस्थापनाचे मत आहे.
विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नंतर या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रोहित शर्मासह त्याची संघात निवड झाली होती. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळेल हे जाहीर केले होते. पण, त्यांनी त्यावेळी विराटबाबत कोणतेही विधान देण्याचे टाळले.
बीसीसीआयचे विराटबाबतचा निर्णय हा निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्यावर सोपवला आहे. त्यांना या निर्णयात अन्य कोणालाही सामावून घ्याचे नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटबाबत आगरकर लवकरच विराटसोबत चर्चा करणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची खेळपट्टी ही संथ असण्याचा अंदाज आहे आणि विराटच्या फलंदाजीच्या स्टाईलला ती पूरक नसेल, हेच आगरकर विराटला समजावून सांगणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी दिली जाईल. बीसीसीआय सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे, आदी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, लोकेश राहुल पुन्हा यष्टिरक्षक-फलंदाज या दुहेरी भूमिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये दिसू शकतो. पण, आयपीएल २०२४ मधील त्याच्या फिटनेसवर सर्व निर्णय अवलंबून आहे. ध्रुव जुरेल व जितेश शर्मा यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून दावा सांगितला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ मधील त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल.