कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतीय खेळाडू आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी पत्नी अनुष्कासोबतचा रोमँटीक फोटो शेअर केला.
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशभरातील क्रीडापटूही पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुनील गावस्कर, अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली, गौतम गंभीर, सुरेश रैना आदी क्रिकेटपटूंसह पी व्ही सिंधू, मेरी कोम, बजरंग पुनिया, हिमा दास, सानिया मिर्झा आदी खेळाडूंनीही आपापल्या परीनं केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत केली. विराटनंही पत्नी अनुष्कासह पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला. त्यांनी नेमकी किती मदत केली, हे जाहीर केलं नाही. पण, विरुष्काचं कौतुक झालं.