भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियाने विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवारी बंगळुरू येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने शुक्रवारी कसून सराव केला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोत 16 वर्षांपूर्वीचा आणि आताचा कोहली एकत्र दिसत आहे. त्यावर कोहलीनं लिहिले की,''16 वर्षांपूर्वीचा कोहली आणि आताचा कोहली.''
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करताना विजयात मोठा वाटा उचलला. शिखर धवनने त्याला ( 40) साजेशी साथ दिली. या सामन्यात कॅप्टन कोहलीनं ट्वेंटी-20तील विश्वविक्रम नावावर केला. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सात विकेट्स राखत सहज पूर्ण केले.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारता रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, रोहितला 12 धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर कोहली आणि धवन यांची चांगलीच जोडी जमली. धवनने 40 धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. पण धवन बाद झाल्यावर रिषभ पंतही चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
कोहलीनं शेअर केलेल्या फोटोची तुलना चाहत्यांना 'तेरे नाम' मधील सलमान खानच्या राधे या पात्राशी केली.