शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना पाकिस्तानी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीसह मोहम्मद शमी, शिखर धवन आणि कुलदीप यादव या चार भारतीय खेळाडूंची नावं पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ''कोणते खेळाडू उपलब्ध असतील याची चाचपणी पाहून गांगुलीनं बीसीबीकडे चार खेळाडूंची नावं पाठवली आहेत. त्यानुसार कोहली, शमी, धवन आणि कुलदीप हे आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आशिया एकादश संघ ठरवण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळानं बीसीसीआयकडून यादी मागवली होती,'' अशी माहिती सूत्रांनी दिली.
आशिया एकादश संघात भारतासह यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचाही समावेश असणार आहे. त्यामुळे कोहली पाकिस्तानी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पण, अद्याप तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशाबद्दल अनिश्चितता आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सरचिटणीस जयेश जॉर्ज यांनी या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना बोलावण्यात येणार नाही, याची खात्री केली आहे. ''आशिया एकादश संघात पाकिस्ताीन खेळाडू नसतील, याची खातरजमा आम्ही केली आहे. दोन्ही देश कोणत्याही निमित्तानं एकत्र येणार नाहीत,''असे जयेश यांनी सांगितले.