IND vs SL Live | मुंबई : भारताचा सलामीवीर शुबमन गिल मागील काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात असून विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी शानदार सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा (४) स्वस्तात माघारी परतल्यानंतर किंग कोहली आणि गिलने मोर्चा सांभाळला. पण दोन्हीही भारतीय शिलेदारांना आपले शतक पूर्ण करता आले नाही. शुबमन गिल ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला तर विराट कोहली ९४ चेंडूत ८८ धावांवर खेळत असताना शिकार झाला. लक्षणीय बाब म्हणजे रोहित, शुबमन आणि विराट या तिघांना दिलशान मदुशंकाने बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, गिलने मारलेला एक चौकार अन् विराट कोहलीने त्यावर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
गिलचा हा चौकार भारताच्या डावाच्या नवव्या षटकात आला. लयनुसार खेळत असलेल्या गिलने कसुन रजिथाला लक्ष्य केले. या षटकातील तिसरा चेंडू रजिताने ऑफ साइडच्या लेंथच्या मागे टाकला, ज्यावर गिलने जोरदार फटका मारला. गिलने कव्हर पॉईंटवर कट शॉट खेळला, त्यादरम्यान बॅट आणि बॉलचा जोराने संपर्क झाला आणि याची झलक देखील आवाजाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली. गिलचा हा अनोखा फटका पाहून किंग कोहली देखील अवाक् झाला. रजिथाने टाकलेला हा चेंडू बॅटला स्पर्श करून वेगाने सीमारेषेबाहेर पोहोचला, जे पाहून विराट कोहलीही चकित झाला. गिलच्या शॉटवर कोहलीच्या चेहऱ्यावरील हावभाव त्याचे कौतुक करत होते. त्यामुळे गिलच्या या शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अॅंजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, महीश तीक्ष्णा, कसुन रजिथा, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका.