-ललित झांबरे : आयसीसीचा खेळाडूवृत्तीचा पुरस्कार आपल्यालाच का मिळाला याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्वतःलाच जसे आश्चर्य वाटलेय तसे क्रिकेट जगतातील बहुतेक जाणकारांनाही वाटतेय. यामागचे कारण आहे गेल्या वर्षभरातील क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या इतरही काही चांगल्या घटना आणि स्वतः विराट कोहलीला काही प्रकरणांमध्ये चुकीच्या वर्तनावरून झालेला दंड. यामुळे खेळाडूवृत्तीच्या पुरस्कार विजेत्याची निवड हा क्रिकेट जगतात सध्या उलटसुलट चर्चेचा विषय झाला आहे.
सँडपेपरने चेंडू खराब केल्याच्या प्रकरणामुळे एक वर्षाची बंदी भोगल्यानंतर आॕस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मीथ जेंव्हा प्रत्येक सामन्यावेळी हुर्रेबाजीचे लक्ष ठरला होता अशावेळी विराट कोहलीने 2019 च्या विश्वचषक सामन्यावेळी प्रेक्षकांना टाळ्या वाजवून स्मीथचे कौतुक करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या या खेळाडूवृत्तीसाठी त्याला स्पिरीट अॉफ क्रिकेट पुरस्कार जाहीर झाला आहे.
विराटच्या नावावर तीन डीमेरिट पाॉईंट
विराटचा हा पुढाकार निश्चितपणे खेळाडूवृत्तीचा होता आणि त्याबद्दल तो कौतुकास पात्र आहे याबद्दल वाद नाही मात्र त्याचवेळी 2018 पासून विराटच्या नावावर तीन डीमेरिट पाॕईंट असून तो आणखी एखाद्या वादात अडकला तर एक कसोटी सामना किंवा दोन वन डे सामन्यांसाठी निलंबनाच्या उंबरठ्यावर आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
त्याचवेळी गेल्या वर्षी आणखीही तीन घटना क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूवृत्तीचा आदर्श निर्माण करणाऱ्या घडल्या त्याकडे आयसीसीने दुर्लक्ष केले की काय, असे या खेळाच्या जाणकारांना वाटणे स्वाभाविक आहे.
न्यूझीलंडचा दिलदार संघ
यापैकी पहिली घटना म्हणजे केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने अतिशय खेळाडूवृत्तीने आणि दिलदारपणे विश्वचषक अंतिम सामन्यात स्विकारलेला पराभव. हा सामना किती विवादास्पद ठरला होता आणि त्यातील चुकीच्या नियमांनी न्यूझीलंडला पहिल्या वहिल्या विश्वविजेतेपदापासून कसे वंचित ठेवले हा इतिहास सर्वश्रूत आहे. आयसीसीने नंतर त्या वादग्रस्त नियमांत सुधारणा केली यावरुनच न्यूझीलंडचा विश्वविजय हिरावून घेतला गेल्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र तरीसुध्या न्यूझीलंडच्या संघाने कोणतीही नाराजी न दाखवता आणि कुठल्याही प्रकारची टिकाटिप्पणी न करता तो पराभव ज्या पध्दतीने स्विकारला ते खेळाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण होतेच याबद्दल शंका असण्याचे कारण नाही.
स्टोक्सची भर मैदानात माफी
गतवर्षीची मनावर कोरली गेलेली खेळाडूवृत्तीची आणखी एक घटना म्हणजे विश्वचषक अंतिम सामन्याच्या शेवटच्या क्षणांत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने दाखविलेले संयमी वर्तन. या सामन्यात आपल्या बॕटीने झालेल्या ओव्हराथ्रोपायी इंग्लंडला विश्वविजय मिळवून देणाऱ्या बहूमोल धावा अपघाताने मिळाल्याबद्दल भर मैदानात माफी मागणारा बेन स्टौक्स हासुध्दा या पुरस्काराचा दावेदार होता असे मत अनेकांचे आहे. विश्वविजयानंतर इंग्लंडचे खेळाडू जेंव्हा जल्लोष करत होते तेंव्हा स्टोक्स मोठ्या खेळाडूवृत्तीने न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी हस्तांदोलन करत होता हे दृश्य अजुनही डोळ्यासमोर येते.
श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा
तिसरी उल्लेखनीय घटना म्हणजे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने मोठ्या हिमतीने केलेला पाकिस्तान दौरा आणि तेथे खेळलेले सामने. वास्तविक याच श्रीलंकन संघाला 2009 मध्ये पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला होता, पण तेच पाकिस्तानात बंद पडलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु करणारे ठरावेत ही खेळाडूवृत्ती नाही तर काय! आता श्रीलंकेनंतर बांगलादेशी संघसुध्दा पाकिस्तानचा दौरा करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर यजमान म्हणून पाकिस्तानचे पुनरागमन झालेय याचे श्रेय श्रीलंकेलाच द्यायला हवे. पाकिस्ताननंतर आता ते झिम्बाब्वेचासुध्दा दौरा करणार असून त्यासह झिम्बाब्वेतील ठप्प पडलेले क्रिकेट पुन्हा सुरु होणार आहे.
डीआरएस'वरुन स्मिथसोबत खटके
आता या तुलनेत विराटचा पुढाकारसुध्दा खेळाडूवृतीचाच होता पण ... याच विराट कोहलीला एकावेळी प्रेक्षकांवर संताप व्यक्त करताना आक्षेपार्ह हावभावासाठी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड झाला होता. साधारण तीन वर्षांपुर्वी याच कोहलीचे डीआरएस वापरावरुन स्मीथसोबत खटके उडाले होते. त्यानंतर दोन्ही संघांमधील संबंध तणावाचे बनले होते. जून ते सप्टेंबर 2019 दरम्यानही कोहलीला चुकीच्या वर्तनासाठी दोन डीमेरिट पाॕईंटचा दंड झालेला आहे. याशिवाय 2018 च्या प्रीटोरिया कसोटी सामन्यातही त्याला एक डीमेरिट गूण मिळाला आहे. त्यामुळे आणखी एखादा वाद झाला तर कोहलीला एक कसोटी किंवा दोन वन डे सामन्यांसाठी बंदी येऊ शकते अशी स्थिती आहे. डिसेंबर 2019 मध्ये विंडीजविरुध्दच्या सामन्यातही रविंद्र जडेजाच्या धावबादच्या निर्णयावरुन विराटने जाहिरपणे व्यक्त केलेल्या संतापाचे उदाहरण ताजे आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाचा नो बॉल नाकारल्याच्या निर्णयावरुनही तो भडकला होता. मध्यंतरी एका क्रिकेटप्रेमीलाही इतर देशांचे गुणगान करणारांनी आमच्या देशात का रहावे असे वादग्रस्त विधान त्याने केले होते. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेवेळीही एका पत्रकारावर त्याने आपला संताप व्यक्त केल्याचे प्रकरण घडले होते. 2013 च्या आयपीएलवेळी तर त्याची आणि गौतम गंभीरची हाणामारी होता होता राहिली होती हा त्याचा इतिहास आहे आणि म्हणूनच स्वतः विराटनेही आश्चर्य व्यक्त केले त्यात आश्चर्य वाटण्यासारखे खरोखरीच आहे असेच म्हणावे लागेल.