पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होत असल्याचे दिसते. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. पण, बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खरे तर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच पाकिस्तानात जाणे टाळले आहे. शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.
युनूस खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने २००९ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही अशी बरीच चर्चा रंगली आहे. पण, मला वाटते की, विराट कोहलीने पाकिस्तानात यायला हवे. ही आमची इच्छा आहे. विराट कोहलीच्या कारकिर्दीत केवळ ही एकच गोष्ट राहिली आहे. ती त्याने पूर्ण करायला हवी.
दरम्यान, आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआय काय भूमिका घेणार? की भारत तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळणार... असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. खरे तर आशिया चषकाची स्पर्धा देखील पाकिस्तानात पार पडली. पण, टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत खेळवले गेले. माहितीनुसार, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयच्या विनंतीनुसार आयसीसी श्रीलंकेत किंवा यूएईत भारताचे सामने खेळवण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत.