Virat Kohli Captain, Kapil Dev: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिका पराभवानंतर संघाचं कर्णधारपद सोडलं. टी२०, वन डे पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडणं हा क्रिकेटरसिकांचा मोठा धक्काच होता. पण साऱ्यांनी विराटच्या निर्णयाचा सन्मान केला आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता विराट कोहली रोहित शर्मा किंवा इतर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खेळणार आहे. इतर कोणाच्याही नेतृत्वाखाली खेळताना नक्की काय करावं? याबद्दलचा मोलाचा सल्ला विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी कोहलीला दिला.
"विराट कोहलीसाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे. पण विराटने शांतपणे निर्णय घ्यावेत. दुसऱ्या खेळाडूच्या हाताखाली खेळणं अजिबातच वाईट नसतं. सुनील गावसकर माझ्या नेतृत्वाखाली संघात खेळले. मी श्रीकांत आणि मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली संघात खेळलो. माझ्या अजिबात अहंकार नव्हता. विराटने आता आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि नव्या दमाच्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळायला शिकायला हवं. त्याचा विराटला आणि भारतीय क्रिकेटला दोघांनाही फायदा होईल", असा महत्त्वपूर्ण सल्ला कपिल देव यांनी दिला.
"विराट हा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार आहे. त्यामुळे विराटने नव्या कर्णधाराला मार्गदर्शन केलं पाहिजे. विराटने नव्या दमाच्या युवा खेळाडूंना चांगलं क्रिकेट कसं खेळावं याचे धडे दिले पाहिजेत. कारण विराट हा फलंदाज म्हणून सर्वोत्तम आहे आणि असा खेळाडू गमावणं भारतीय क्रिकेटला परवडणार नाही", असं रोखठोक मत कपिल देव यांनी एका क्रीडा वाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.
सध्या वन डे आणि टी२० संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं आहे. पण भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असेल याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अनेक जाणकारांनी विविध नावं सुचवली आहेत. रोहित शर्माव्यतिरिक्त केएल राहुल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह यांचीही नावे स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र बीसीसीआयची निवड समिती काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
Web Title: Virat Kohli Should keep Aside Ego and Play under new Captain Rohit Sharma says Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.