Virat Kohli Rohit Sharma, T20 World Cup 2024: सध्या भारतात IPL 2024चा हंगाम सुरु आहे. याचदरम्यान आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात यशस्वी जैस्वालला सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले आहे. त्यामुळे रोहित-जैस्वाल ही जोडी सलामीला उतरेल असा अंदाज सामान्यपणे क्रिकेट चाहते लावतान दिसत आहेत. पण भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने एक वेगळाच प्लॅन तयार करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला दिला आहे. या सल्ल्यानुसार, विराट कोहलीने यशस्वी जैस्वालसोबत सलामीला यावे तर रोहित शर्माने एक वेगळी भूमिका पार पाडावी, असे जाडेजा म्हणाला आहे.
"माझ्या मते, विराट कोहलीने सलामीला फलंदाजी करावी. रोहित शर्मा हा सध्या संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरु असणार. अशा वेळी त्याला सामना सुरु झाल्यानंतर थोडासा मोकळा वेळ मिळायला हवा. त्यामुळे विराटने सलामीला यावे आणि त्याच्या जागी रोहित शर्माने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी", असा सल्ला अजय जाडेजाने दिला आहे.
"जर तुमच्या संघात विराट कोहली असेल, तर तुम्हाला चांगली संधी आहे. तुम्ही विराट कोहलीचे फलंदाजीतील सातत्य पाहिले आहे. त्याचा तुम्ही नक्कीच वापर करून घेऊ शकता. तो उत्तम फलंदाज आहे आणि आता तो पॉवरप्ले मध्येही चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. एकदा त्याने २०-३० धावा केल्या की तो मोठी धावसंख्या उभारू शकतो हे सगळ्यांनी पाहिले आहे. आणि नंतर स्पिन गोलंदाजी आल्यावर विराट सर्वोत्तमच खेळतो. त्यामुळे विराटने डावाची सुरुवात करावी," असे मत जाडेजाने व्यक्त केले.