Virat Kohli Ravi Shastri, Aus vs Ind 4th Test at MCG: भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील चौथी कसोटी उद्यापासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तसेच भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने केल्या आहेत. जगातील महान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीने या दौऱ्यावर आतापर्यंत भारतीयांना निराश केले आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू खेळून बाद होण्याची त्याची सवय अजूनही जात नाही. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. कालच, भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की विराटसारखे महान फलंदाज अशा समस्यांवर स्वत:च तोडगा काढतील. तशातच आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दोघेही या मालिकेत अद्याप फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. याच मुद्द्यावर रवी शास्त्रींनी रोखठोक भाष्य केले आहे. "मला असे वाटते की सध्या दे दोघेही वाईट खेळत आहेत. याचे कारण असे की जो रूट खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे, केन विल्यमसन देखील उत्तम खेळतोय, हॅरी ब्रूकने देखील खूप चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याशिवाय अनेक नवीन खेळाडू सध्या क्रिकेटमध्ये ठसा उमटवत आहेत. अशा परिस्थितीत विराट किंवा स्मिथ प्रचंड धोकादायक ठरू शकतात. कारण त्यांना आता धावांची प्रचंड भूक असणार आहे," असे रवी शास्त्री म्हणाले.
"मला वाटत नाही की विराट किंवा स्मिथ फॉर्ममध्ये नाहीत. त्यांचा खेळ चांगला आहे. पण त्यांच्या खेळीत काही गोष्टींचा अभाव आहे. स्मिथने गेल्या सामन्यात एक बदल केला. तो घाईघाईत धावा करत नव्हता. त्याने शांतपणे काही वेळ पिचवर घालवला आणि मग त्याने शतक ठोकले. विराट कोहलीदेखील खराब फॉर्ममध्ये आहे असं मी म्हणणार नाही. माझ्या मते, विराटने जर पहिल्या ३० ते ४० मिनिटांच्या काळात पिचवर शिस्तबद्धपणे फलंदाजी केली. तर तो नक्कीच मोठी खेळी करू शकेल. कारण तो चांगला फलंदाज आहे," असा सल्ला विराट कोहलीने दिला.