Virat Kohli Sachin Tendulkar Adam Gilchrist, IND vs AUS 2nd Test : टीम इंडियाने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी जिंकली. त्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. पण भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला. नंतर ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. भारताचा डाव अवघ्या १७५ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाला केवळ १९ धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हान सहज पूर्ण करत यजमान कांगारुंनी दहा गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाचा रनमशीन अशी ओळख असलेला विराट कोहली दुसऱ्या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. विराट कोहलीने पहिल्या डावात ७ धावा तर दुसऱ्या डावात ११ धावा केल्या. त्याच्या या अपयशानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अँडम गिलख्रिस्ट याने विराटला मोलाचा सल्ला दिला. यावेळी त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला.
सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियातील काही कसोटी डावांमध्ये अपयश आल्यानंतर आपल्या खेळीत एक मोठा बदल केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर तो सातत्याने बाद होत होता. त्यामुळे सिडनी टेस्टमध्ये सचिनने ठरवून ऑफ स्टंपच्या बाहेरील एकही चेंडू मारला नाही. परिणामी त्याला नाबाद २४१ धावांची दमदार खेळी करता आली होती. त्याच खेळीतून प्रेरणा घेण्याचा सल्ला अँडम गिलख्रिस्टने विराटला दिला आहे.
"गोलंदाज कशापद्धतीने चेंडू टाकेल किंवा आपल्याला बाद करण्यासाठी कुठली युक्ती वापरेल हे सारं फलंदाजांसाठी फारसं महत्त्वाचं नसतं. फलंदाजांसाठी सर्वात मोठी कसोटी म्हणजे तुमच्या आतून येणारा आवाज असतो. तुम्ही तुमच्या कानांनी काय-काय ऐकता त्याचा तुमच्या खेळावर परिणाम होत असतो. त्यामुळे मी विराटच्या फलंदाजीवर काहीही बोलायला जाणार नाही. मला वाटते की त्याने मानसिकता बदलायला हवी. सचिनने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील कसोटीत जे केलं होतं तशी गोष्ट करायचा प्रयत्न विराट कोहलीने करायला हवा. त्याने स्वत:च्या मनाशी ठरवलं पाहिजे की ऑफ स्टंपच्या बाहेर कितीही चेंडू आले तरीही मी ते चेंडू खेळणार नाही. गोलंदाजांनी स्टंपच्या रेषेत गोलंदाजी करावी तरच मी बॅटने खेळेन असं विराटने ठरवून टाकलं पाहिजे," असा अतिशय समतोल मत अँडम गिलख्रिस्टने मांडले.
"अंडर १९ क्रिकेट पासूनच चाहत्यांनी त्याच्यावर अपेक्षांचे ओझे ठेवले. तो बराच काळ क्रिकेट खेळतोय. त्याच्याकडे पुरेसा अनुभवही आहे. तो मानसिक स्तरावरही खूप कणखर आहे. त्यामुळे त्याने जर ठरवलं तर तो त्याला जसं हवं तसं खेळू शकतो आणि गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवू शकतो. विराटवर सध्या टीका होत आहे, त्यामुळे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे," असेही गिलख्रिस्ट म्हणाला.