Virat Kohli, IND vs PAK: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांची नशिबं बरीचशी सारखी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २०१९ मध्ये स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली दोघांनीही शेवटचं शतक ठोकलं, पण त्यानंतर दोघांनाही अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करता आलेलं नाहीये. या मागे नक्की काय कारण असावं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण पाकिस्तानच्या एका क्रिकेटरने (Pakistan Ex Cricketer) याबाबत मत व्यक्त करताना विराट कोहलीबद्दल एक मोठं विधान केलं.
मला असं वाटतं की या फलंदाजांना अनेक वेळा तुलनेने सोप्या पिचवर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. हे खेळाडू अशाच परिस्थितीत चांगली कामगिरी करतात जेथे त्यांच्या सोयीची फिल्डिंग लावलेली असते आणि पिच हे फलंदाजीसाठी पोषक असते. स्टीव्ह स्मिथने गेल्या सामन्यात जे चौकार मारले ते पाहण्याजोगे होते. पण ते त्यावेळीच मारले गेले जेव्हा त्याच्या सोयीनुसार फिल्डिंग लागलेली होती. मग अशा वेळी जर कोणी त्या जागांवर फिल्डर्स लावले तर हे फलंदाज लगेच संथ होतात आणि विकेट फेकतात", असं पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ म्हणाला.
"खरं सांगायचं तर स्मिथ असो किंवा कोहली, त्यांच्यावर खूप दडपण असतं. स्मिथ जेव्हा उपखंडात येतो तेव्हा त्याला अँशेस पेक्षा जास्त दडपण असतं. त्या दडपणामुळेच त्यांच्या २५-३० धावा कमी होतात. आणि दडपण वाढत गेलं की अख्खं वर्ष शतकाविना जातं. विराट कोहलीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार आहे. विराट फक्त त्याच पिचवर हिरो असतो जिथे त्याला अपेक्षित परिस्थिती मिळते. पिचचा फॅक्टर हा विराटसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पण मला विश्वास आहे की हे फलंदाज एकदा फॉर्मात परतले की ते झटपट पुढे जातात", असं माजी पाकिस्तानी खेळाडूने सांगितलं.