सेन्च्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांवर खापर फोडलं आहे. गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, पण फलंदाजांच्या अपयशामुळे पराभवाचा सामना करावा लागला असं कोहली म्हणाला.
सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, आम्हाला चांगल्या भागीदाऱ्या रचताच आलेल्या नाहीत. गोलंदाजांनी आपली कामगिरी चांगली बजावली. फलंदाजांनी मात्र अपेक्षेप्रमाणे खेळ केला नाही. आपल्याला फलंदाजांनी निराश केल्याचं कोहलीनं सामन्यानंतर बोलताना स्पष्ट केलं. ढिसाळ क्षेत्ररक्षण हेही पराभवाचे एक कारण असल्याचे कोहली म्हणाला.
भारतानं मालिकाच गमावल्यामुळे आता माझ्या 150 धावांच्या खेळीचे काहीच महत्त्व राहिलेले नाही. आम्ही जर जिंकलो असतो तर 30 धावांचे महत्त्वही अधिक झाले असते अशा शब्दांत कोहलीने आपली नाराजी जाहीर केली. आम्ही क्षेत्ररक्षण करतानाही चुका केल्या. दक्षिण आफ्रिका संघानं मात्र, या चुका केल्या नाहीत आणि म्हणूनच तो संघ विजेता ठरला आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवासाठीही विराट कोहलीने फलंदाजांना जबाबदार धरलं होतं, आणि आता दुस-या कसोटी सामन्यानंतरही कोहलीने फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे .