जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली आशिया कपमधून पुनरागमन करत आहे. कोहली गेल्या तीन मालिकांमध्ये भारताकडून खेळला नव्हता आणि आता तो थेट आशिया कपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. कोहलीला आराम देण्यात आला होता. यामुळे तो वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला नाही. आशिया कप-2022 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यातून कोहली पुनरागमन करेल आणि तो फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी कोहलीने स्वतःबद्दल काही खुलासे केले आहेत. फॉर्मशी झगडणाऱ्या कोहलीने पहिल्यांदाच तो मानसिकदृष्ट्या खचला होता याची कबुली दिली आहे. आयुष्याच्या कठीण वेळेचा सध्या आपण सामना करत असल्याचेही त्याने मान्य केले आहे.
2019 पासून विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. इतकंच काय तर गेल्या काही सामन्यांमध्ये अर्धशतक गाठणं देखील विराटला कठीण होत आहे. चांगल्या सुरुवातीचं मोठ्या डावात रूपांतर करण्यात विराटला अपयश येत आहे. अशा परिस्थितीत कोहली आशिया चषकातून पुन्हा एकदा फॉर्मात येईल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
महिनाभर बॅटला हातही लावला नाहीआशिया कपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कोहलीने मनमोकळेपणानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेला महिनाभर बॅटला हात लावण्याची हिंमत झालेली नाही असं सांगत कोहलीनं तो सध्या अतिशय कठिण काळाचा सामना करत असल्याचं स्पष्ट केलं. “गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच असं घडलं असेल की मी गेला महिनाभर माझी बॅट हातात धरलेली नाही. गेल्या काही काळापासून वेगळ्यापद्धतीनं स्वत:ला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की माझ्यात ती ताकद आहे. पण तुझं शरीर तुला थांबायला सांगतंय. माझं मन मला विश्रांती घ्यावी असं सांगत होतं. त्यामुळे मी महिनाभर क्रिकेटपासून दूर होतो", असं कोहलीनं सांगितलं.
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतातकोहली म्हणाला की तो मानसिकदृष्ट्या खूप सक्षम आहे पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात हेही त्यानं मान्य केलं. तो म्हणाला, “मानसिकदृष्ट्या खूप भक्कम व्यक्ती म्हणून मला ओळखलं जातं. पण शेवटी मीही एक व्यक्ती आहे आणि प्रत्येकाला एक मर्यादा असतेच. ती मर्यादा तुम्ही ओळखली पाहिजे नाहीतर गोष्टी चुकतात. हा काळ मला खूप काही शिकवून गेला. ज्या गोष्टी समोर येत होत्या. मी त्यांचा स्वीकार केला आहे"
मानसिक अस्वस्थता होतीकोहलीनं यावेळी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं मान्य केलं. मला हे मान्य करायला काहीच हरकत नाही की मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो. ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु आम्ही संकोच करतो म्हणून आम्ही बोलत नाही. आपल्याला कुणी मानसिकदृष्ट्या कमकुवत म्हणावं वाटत नाही, असं कोहली म्हणाला.