- बाळकृष्ण परब प्रियविराट कोहलीभारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय तू काल तडकाफडकी जाहीर केलास. फलंदाज असूनही काल तू कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी जो ट्विटरूपी यॉर्कर टाकलायस, त्यामुळे अनेकजण क्लीन बोल्ड झालेत. मात्र त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील गोंधळही वाढलाय. या निर्णयानंतर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून तू दिलेलं योगदान, तुला मिळालेलं यश अपयश, तुझ्यातील गुण, तुझ्यातील दोष या सर्वांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण आज एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवतेय ती म्हणजे तुझ्या नेतृत्वातला ग्रेटनेस भारतीय क्रिकेटमधील बऱ्याचजणांना कळलाही नाही.
२००८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करताना तू भारताला विजेतेपद पटकावून दिलेस आणि तेव्हापासून तुझे नाव भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच आघाडीवर राहिले. वनडे, टी-२०, कसोटी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तू तुझ्या फलंदाजीची छाप पाडलीस. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज कर्णधाराकडून तू नेतृत्वाची कमान स्वीकारलीस. तेव्हा तुझ्यासारखा आक्रमक माणूस भारतीय क्रिकेटला पचेल का? तो यशस्वी ठरेल का? अशा अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र तू कर्णधार म्हणून कमालीचा यशस्वी ठरलास. तुझ्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे आणि टी-२० धडाकेबाज कामगिरी केली. कसोटीमध्ये तू भारतीय संघाला सातव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर घेऊन आलास. सलग सहा वर्षे भारतीय संघ कसोटीमध्ये अव्वलस्थानी राहिला. फक्त तुझ्या नेतृत्वात एकच उणीव राहिली ती म्हणजे तू भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देऊ शकला नाहीस. मात्र तो अपवाद सोडला तर तुझी कामगिरी दृष्ट लागण्यासारखी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढी दैदिप्यमान कामगिरी करूनही तुझ्यावर सतत टीका होत राहिली. त्यात तुझं यश झाकोळण्याचा प्रयत्न केला गेला. इतर कर्णधारांवर होतात. तसे आरोप तुझ्यावरही झाले. तू काही खेळाडूंची बाजू घेतोस, काही जणांना मुद्दाम बाहेर ठेवतोस. रवी शास्त्रींसोबत मिळून तू मनमानी केलीस. कर्णधारपद टिकवण्यासाठी तू प्रयत्नशील आहेस, असे एक ना अनेक आरोप झाले. मात्र तुझी कामगिरी खणखणीत असल्याने विरोधक तुला काही बोलू शकत नव्हते. पण गेल्या काही काळात तशी संधी मिळाली. अनिल कुंबळेसोबतचे तुझ्या मतभेदांच्या चर्चा सर्वश्रुत होत्या. त्यात आता गेल्या काही दिवसांत बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या गांगुलीसोबतच्या वादाने भर टाकली. त्यातून जुने हिशोब चुकते झाले. मात्र ही वेळ तुझ्यासाठी अनुकूल नव्हती. त्यातून अखेर जे व्हायला नको होतं, तेच झालंय, आता त्यावर अधिक चर्चा करण्यात काही अर्थ नाही.
तुझा आक्रमक स्वभाव हे तुझ्यावर आक्षेप घेण्यामागचं सर्वात मोठं कारण. कसंय की भारतीयांना संयमी, शांत व्यक्तिमत्त्वांचं फार आकर्षण. मग अशा संयमी नेतृत्वानं जगातील चार देशात जाऊन सपाटून मार खाल्ला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत परदेशात गेल्यावर भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांच्या शेरेबाजीला सुरुवात झाली की हरे राम हरे कृष्ण म्हणत लोटांगण घालत असे. सौरव गांगुली कप्तान झाल्यानंतर ही परिस्थिती काहीशी बदलली. मात्र प्रतिस्पर्ध्यांशी केवळ डोळ्यात डोळे घालून न बघता त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची सुरुवात तू केलीस. त्यातून अनेकदा वादही झाले. मात्र त्याचा भारतीय संघाला फायदाच झाला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा जगातील कुठल्याही देशात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी उजवी झालेली दिसली.
तू जवळपास ७ वर्षे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होतास, एवढा दीर्घकाळ संघाचं नेतृत्व करताना तू केलेल्या कामगिरीचा ग्रेटनेस सांगण्यासाठी या काळातील आकडेवारी पुरेशी आहे. सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली या भारतीय क्रिकेटमधील त्या त्या काळातील यशस्वी कर्णधारांनी संघाचे जेवढ्या सामन्यात नेतृत्व केलं, तेवढ्या सामन्यात तू भारतीय संघाला कसोटी विजय मिळवून दिले आहेत. ६८ सामने, ४० विजय, १७ पराभव आणि ११ अनिर्णित ही आकडेवारी सारं काही सांगून जाते. केवळ भारतीय क्रिकेटच नाही, तर जागतिक कसोटी क्रिकेटमध्येही तुझी आकडेवारी ही अव्वल चार कर्णधारांमध्ये तुझी गणना करणारी आहे. तुझ्यावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांमध्ये तुझं हे यश झाकोळलं गेलं.
पण काल तू ज्याप्रकारे तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलास, त्यामुळे तुझ्या विरोधकांबरोबरच भारतीय क्रिकेटलाही जोरदार धक्का बसला आहे. तुझ्या नेतृत्वाची उणीव नक्कीच जाणवेल. पण क्रिकेट कुणासाठी थांबत नाही. तुझ्या नेतृत्वाचाही पर्याय समोर येईल. मात्र भारतीय कसोटी संघाला अजून पुढचा काही काळ कसोटीचा जाणार आहे. पण एक फलंदाज म्हणून आता तू अधिक मोकळेपणाने खेळू शकशील. गेल्या सव्वा दोन वर्षांपासून तुझ्या बॅटमधून शतक आलेलं नाही. ते लवकरच येईल आणि एक फलंदाज म्हणून मुक्तपणे फटकेबाजी करणारा विराट कोहली पुन्हा आम्हाला दिसेल, एवढीच अपेक्षा. तुझाच एक निस्सिम चाहता