( Marathi News ) दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने ( Dean Elgar) विराट कोहलीवर धक्कादायक आरोप केले आहेत. कसोटी सामन्यादरम्यान भारतीय फलंदाज माझ्यावर थुंकला होता असे, एल्गर म्हणाला. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहकारी एबी डिव्हिलियर्स याने समजावल्यानंतर दोन वर्षानंतर कोहलीने माफी मागितल्याचेही एल्गरने म्हटले.
एल्गरने डिसेंबरमध्ये मायदेशात भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केल्यानंतर निवृत्ती घेतली. त्याने एका पॉडकास्टवर खुलासा केला की कोहली आणि आर अश्विन यांच्याशी त्याचा वाद झाला होता. २०१५च्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यातील हा प्रसंग असल्याचे त्याने सांगितले. या पॉडकास्टमध्ये त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिस आणि रग्बीपटू जीन डी व्हिलियर्स होते.
यावेळी एल्गरने 'बँटर विथ द बॉईज' पॉडकास्टवर सांगितले की, ''भारतात... त्या विकेट्स मजेशीर होत्या आणि मी बॅटिंगमध्ये आलो. मला अश्विन व जडेजाचा सामना करायचा होता. पण, मला जडेजाचे नाव नीट काही समजत नव्हते. मी त्याचे नाव काय आहे जजेजा... जा-जा-जाजेजा असे म्हणत होतो, तेव्हा मागून कोणीतरी 'जडेजा' असे म्हटले. कोहली माझ्यावर थुंकला.''
''मी त्याला म्हणालो, जर तू हे केलं असशील, तर मी या बॅटने तुला मारेन...''असा दावाही एल्गरने केला.
"त्याला तो शब्द समजला का?" त्या शिवीचा संदर्भ देत पॉडकास्ट होस्टने एल्गरला विचारले. "होय, कारण डिव्हिलियर्स RCBमधील सहकारी होता त्यामुळे त्याला ते समजले. मी म्हणालो, 'तू असे केलेस तर मी तुला बॅटने पूर्णपणे बाद करेन'," असा एल्गरने दावा केला.
दक्षिण आफ्रिकेच्या माजी सलामीवीराने सांगितले केले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, डिव्हिलियर्सने त्याचा जवळचा मित्र आणि RCB चा सहकारी कोहली याच्याशी या विषयी चर्चा केली. डिव्हिलियर्सची कोहलीशी नेमकी कधी चर्चा केली याबाबत एल्गरने विशेष माहिती दिली नाही. तो म्हणाला, "डिव्हिलियर्सला समजले की त्याने काय केले आणि तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला,' तू माझ्या टीममेटच्या तोंडावर का थुंकला? ते योग्य नाही' आणि दोन वर्षांनंतर, कोहलीने मला मॅच संपल्यानंतर बाजूला बोलावले आणि म्हणाला,' मालिकेनंतर आपण ड्रिंक्ससाठी जाऊ शकतो का?"
''त्याला त्या कृतीची माफी मागायची होती,''असे एल्गर म्हणाला. ''दोन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आल्यावर तो म्हणला की त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला माफी मागायची आहे. आम्ही प्यायलो, पहाटे ३ वाजेपर्यंत प्यायलो. जेव्हा तो मद्यपान करत होता, आता तो थोडासा बदलला आहे,” असेही एल्गर पुढे म्हणाला.
कोहली आणि अश्विन विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटची कसोटी खेळण्याचा अनुभव कसा होता, असे विचारले असता, एल्गरने उत्तर दिले, "अप्रतिम."
डिसेंबर २०२३ मध्ये केपटाऊन येथे झालेल्या त्याच्या शेवटच्या कसोटी डावात एल्गरचा झेल घेतल्यावर कोहलीने आनंद साजरा केला नाही आणि पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला त्याने मिठी मारली. कोहलीने त्याची एक टेस्ट जर्सीही त्याला दिली.
Web Title: 'Virat Kohli spat at me': Former South Africa skipper Dean Elgar has alleged that Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.