केपटाऊन : विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लाजिरवाण्या मालिका पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा शनिवारी तडकाफडकी निर्णय घेत खळबळ माजवून दिली. २०१४ ला धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या मध्यात कर्णधारपद सोडल्यामुळे विराटकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कोहलीने अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत ट्विट केले. त्यात त्याने लिहिले, ‘प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे थांबावेच लागते. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी आता थांबण्याची वेळ आली आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले मात्र माझ्या प्रयत्नात आणि विश्वासात मी कमी पडलो नाही.’
भारताने द. आफ्रिकेविरुद्ध मालिका १-२ ने गमावल्याच्या एक दिवसानंतर विराटने हा निर्णय घेतला. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. त्याच्याच नेतृत्वात संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली.
३३ वर्षांच्या विराटने अलीकडे टी-२० चे नेतृत्व सोडल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्वदेखील काढून घेतले होते.
शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. कोहलीने लिहिले, ‘सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही.
कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.’
कोहलीची विराट कामगिरी...
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. २०१५-१६ हंगामात भारताने श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. २०१६ मध्येच, भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि त्यानंतर देशांतर्गत हंगामात सलग १३ कसोटी सामने जिंकले. त्या मोसमात भारताने सलग चार कसोटी मालिका जिंकल्या. त्यांचा एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झाला. त्यानंतर २०१७-१८ च्या मोसमात भारताने श्रीलंकेवर पाठोपाठ विजय मिळवित मालिका जिंकली. २०१८ साली भारताने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून मालिका गमावली, पण नंतर जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार बनला. विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
बीसीसीआय म्हणाले, ‘अभिनंदन विराट’!
बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले,‘बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.’
Web Title: virat Kohli steps down as Indias Test captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.