ललित झांबरे : विराट कोहलीने शुक्रवारी पुणे येथे नाबाद २५४ धावांची ‘विराट’ खेळी करताना अनेक विक्रम केले. पण एका बाबतीेत तर तो सर डॉन ब्रॅडमन वगळता इतर सर्व फलंदाजांमध्ये सरस ठरला आहे. ब्रॅडमन यांची तर तुलनाच होऊ शकत नाही पण त्यांच्यानंतर विराट कोहलीच्याच द्विशतकांचा धडाका सर्वात जलद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच पेक्षा अधिक द्विशतके करणाºया फलंदाजांची तुलना करता त्याचा हा मोठ्ठा पराक्रम समोर आला आहे.
विराटने आपले पहिले कसोटी द्विशतक आपल्या ४२ व्या कसोटीत आणि ७३ व्या डावात केले होते. त्यानंतर त्याने त्यात आणखी सहा द्विशतकांची भर टाकलीय ती फक्त पुढच्या ४० कसोटी आणि ६६ डावात. म्हणजे या काळात जवळपास प्रत्येक सहा कसोटी सामन्याला त्याने एक द्विशतक आपल्या नावावर लावले आहे.
अतुलनीय सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांची १२ द्विशतके केवळ ४१ कसोटी सामन्यांच्या ६० डावांतच केली होती. त्यानंतर केवळ विराटच द्विशतकांच्या बाबतीत एवढा वेगवान आहे. ब्रॅडमन यांनी आपल्या १२ व्या डावात पहिले द्विशतक लगावले होते. मात्र पुढच्या ५९ डावात त्यांनी आणखी ११ द्विशतके लगावली.
या दोघांनंतर द्विशतकांचा जलद धडाका आहे तो राहुल द्रविडचा. द्रविडने आपले पहिले द्विशतक ३९ व्या कसोटीच्या ६८ व्या डावात केल्यानंतर पुढे आणखी चार द्विशतके लगावली. त्याची एकूण पाच द्विशतके ४० कसोटी सामन्यांच्या काळातील ६८ डावात आली आहेत.
ब्रॅडमन यांची १२ द्विशतके साडेसतरा वर्षांच्या काळात आली पण त्यावेळेच्या क्रिकेट सामन्यांची वारंवारता, महायुध्दांचा व्यत्यय आणि ब्रॅडमन यांच्या द्विशतकांची संख्या पाहता त्यांची तुलना होऊच शतक नाही पण ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात कमी काळात सर्वाधिक द्विशतक झळकावण्यातही विराट कोहली व राहुल द्रविड हेच आघाडीवर आहेत.
विराटने आपली सात कसोटी द्विशतके केवळ तीन वर्ष आणि ८० दिवसांच्या काळात केली आहेत आणि राहुलची पाच द्विशतके ही ३ वर्ष १४६ दिवसांच्या काळात आली आहेत.
सर्वात कमी डावात सर्वाधिक द्विशतके
(पहिले द्विशतक ते शेवटच्या द्विशतकादरम्यान खेळलेले कसोटी डाव- पात्रता- किमान पाच द्विशतके)
द्विशतके- कसोटी- डाव- फलंदाज
--------------------------------------------------------------
१२- ४१- ६०- डॉन ब्रॅडमन
------------------------------------
११- १११- १९६- कुमार संघकारा
------------------------------------
०९- १२६- २२२- ब्रायन लारा
------------------------------------
०७- ४०- ६६- विराट कोहली
०७- ५८- ९६- वॉली हॅमंड
०७- १३६- २२९- महेला जयवर्धने
------------------------------------
०६- ६१- १०४- मार्व्हन अट्टापटू
०६- ७४- १३४- युनिस खान
०६- ९५- १४५- जावेद मियांदाद
०६- ८४- १४७- विरेंद्र सेहवाग
०६- १०१- १७१- सचिन तेंडुलकर
०६- ९७- १७३- रिकी पोंटींग
------------------------------------
०५- ४०- ६८- राहुल द्रविड
०५- ९१- १६५- अॅलिस्टर कूक
०५- ११०- १९१- ग्रॅमी स्मिथ
------------------------------------
Web Title: Virat Kohli is superfast after Sir Don Bradman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.