आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरस्टार खेळाडूंची संख्या कमी आहे. इंग्लंडमध्ये असे एक किंवा दोन खेळाडू असतील. पण, विराट कोहली असा शिलेदार आहे जो कसोटी क्रिकेटची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवू शकतो, अशी दाद दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथनं दिली आहे.
विराट कोहलीनं नुकताच वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठला. सर्वात कमी इनिंग्जमध्ये 'दस हजारी मनसबदारी' ठरण्याचा विक्रम त्यानं नोंदवला. त्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला - होतोय. परंतु, वनडे क्रिकेटमधील हा 'स्टार' कसोटी क्रिकेटचा तारणहार, आधार असल्याचं स्मिथला मनापासून वाटतंय. जगमोहन दालमिया परिषदेसाठी भारतात आलेल्या स्मिथनं विराटची पाठ थोपटली. आयपीएल आणि टी-२० क्रिकेटची क्रेझ असलेल्या भारतात विराटनं कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम ठेवली आहे. तो 'सुपरस्टार' आहे. त्याच्यासारखा शिलेदार जोवर कसोटी खेळत राहील, तोवर कसोटी क्रिकेटची शान टिकून राहील, असा विश्वास स्मिथनं व्यक्त केला.
जगातील सगळ्यात यशस्वी कसोटी कर्णधाराचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. १०९ कसोटींपैकी ५३ सामन्यांत त्यानं दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता. या विक्रमवीर कर्णधाराची शाबासकी विराटसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.
कूकाबुरा चेंडू नकोच!
कसोटी क्रिकेटमधील थरार घालवून टाकण्याचं काम कूकाबुरा चेंडू करत असल्याचं मत स्मिथनं मांडलं. हा चेंडू फार काळ स्विंग होत नाही. त्यामुळे कसोटी सामने रंगतच नाहीत. याउलट, स्पिन होणारा, स्विंग होणारा आणि हवेत दिशा बदलणारा चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये रंग भरू शकतो, असं त्यानं स्पष्ट केलं.