कर्णधारपदाचा भार हलका करूनही विराट कोहलीला ( Virat Kohli) सूर गवसलेला नाही. पाच महिन्यांनंतर ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणारा विराट इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १ धावेवर माघारी परतला. ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने त्याची विकेट घेतली आणि चाहते पुन्हा नाराज झाले. क्रिकेटमध्ये आता अशी कोणतीच पद्धत राहिली नसेल की ज्यावर विराट बाद झाला नसावा. तो खराब फॉर्मातून बाहेर येण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु यश त्याच्या वाट्याला येताना दिसत नाही. अशात विराटचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे.
InsideSport शी बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाला, विराट हा भारतीय क्रिकेटचा ग्रेट सेवक आहे. तो बेस्ट खेळाडूंपैकी एक आहे, यात शंकाच नाही, परंतु तो सध्या फॉर्माशी झगडतोय. निवड समितीने आता खेळाडूची निवड ही त्याच्या फॉर्म पाहून करायला हवी, त्याची पत पाहून नव्हे. मला हे बोलण्याचा अधिकार नाही, परंतु त्याने आता लवकरच फॉर्म मिळवायला हवा. कामगिरी करा किंवा संघाबाहेर व्हा... इंग्लंड मालिकेत त्याच्या अपयशाचा पाढा कायम राहिल्यास, निवड समिती ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करेल, असे मला वाटते. असा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे.
त्यात महान कर्णधार कपिल देव यांनीही विराटच्या खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. "जर आपण कसोटीमधील दुसरा सर्वोत्तम गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बाहेर ठेवू शकतो तर माजी एक नंबरचा फलंदाज देखील बाहेर होऊ शकतो. तसेच मलाही वाटते की कोहलीने धावा कराव्या, मोठी खेळी करावी मात्र सध्या त्याची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे", असे परखड मत कपिल देव यांनी मांडले.
अजय जडेजानेही ( Ajay Jadeja) मोठे विधान केले आहे. ''विराट कोहली खास खेळाडू आहे. जर तो विराट कोहली नसता, तर तो कसोटी क्रिकेटही खेळत नसता. पण, मागील ८-१० सामन्यांत त्याच्या धावा पाहा, त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. पण, म्हणून काय तुम्ही त्याला संघाबाहेर बसवू शकत नाही. कारण, त्याने मागील अनेक वर्षांत खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण, जर मला आता कुणी ट्वेंटी-२० संघ निवडायला सांगितला, तर मी त्याल नक्की बाहेर बसविन,'' असे जडेजा म्हणाला.