भारतीय नियामक क्रिकेट मंडळानं ( BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या तीनही संघांची निवड केली. रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीच्या संघात निवड जाहीर करताना BCCIनं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार असल्याचे सांगितले. विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत आणि अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं रजा मागितली. बीसीसीआनं कर्णधाराच्या या निर्णयाचा आदर करताना ही सुट्टी मान्य केली. पण, विराटच्या या निर्णयावर नेटिझन्समध्ये जुंपली आहे.
विराटनं 'राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या'ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली. 2015च्या वर्ल्ड कप साठी धोनी दौऱ्यावर होता आणि त्याचवेळी मायदेशात असलेल्या पत्नी साक्षीची प्रसुती झाली आणि झिवाचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर लगेच भारतात परतण्याऐवजी धोनीने संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच मायदेशात परतला होता.
यावेळी एका पत्रकार परिषदेमध्ये तुला घरची आणि तुझ्या मुलीची आठवण येत नाही का? असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ''सध्या मी राष्ट्रीय कर्तव्यावर आहे. मी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करु शकत नाही. आमच्यासाठी वर्ल्ड कप स्पर्धा खूप महत्वाची आहे.''