Virat Kohli Dance, IND vs WI 2nd ODI: वन डे आणि टी२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली सध्या मैदानावर खूप एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहलीला पहिल्या दोन्ही सामन्यात फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. पण क्षेत्ररक्षण करताना मात्र तो मैदानात धमाल मस्ती करताना आणि डान्स करताना दिसला. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण विराट मात्र १८ धावा करून बाद झाला. ओडियन स्मिथने त्याला माघारी धाडलं. पण त्यानंतर ओडियन स्मिथ फलंदाजी करत असताना त्याचा झेल विराटने घेत विकेटचा बदला घेतला आणि भन्नाट डान्स करत आनंद साजरा केला.
२३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा खालच्या फळीतील फलंदाज ओडियन स्मिथ हा भारतीय गोलंदाजांना चोप देण्याच्या विचारात होता. पण नेतृत्व कौशल्य आणि उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय संघाने स्मिथला बाद केले. कोहलीने सीमारेषेच्या जवळ ओडियन स्मिथचा अप्रतिम झेल घेतला. या झेलनंतर विराट त्या क्षणाचा खास आनंद लुटताना दिसला. तसेच नंतर विराट मैदानात वेगळ्याच स्टाईलमध्ये डान्स करतानाही दिसला.
दरम्यान, पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचे पहिले दोन वन डे सामने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आणि मालिकाही जिंकली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत पहिल्यांदाच सलामीला आलेला ऋषभ पंत मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. त्यामुळे टीम इंडियाने पहिले ३ बळी ४३ धावांतच गमावले होते.
मधल्या फळीत लोकेश राहुल (४९) आणि सूर्यकुमार यादव (६४) यांनी ९१ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाची धावसंख्या २०० पार नेली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. प्रसिध कृष्णाने ९ षटकांत १२ धावा देत ४ बळी घेतले. आपला सहावा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या प्रसिध कृष्णाने वन डे मध्ये प्रथमच सामनावीराचा किताब पटकावला.