Virat Kohli Superb catch Video, IND vs NZ 1t Test: बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका २-० ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ उद्यापासून न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. WTC 2025 मध्ये अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण WTC 2025 च्या आधी ही भारताची मायदेशातली शेवटची कसोटी मालिका असणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंना मैदानात उतरवेल. म्हणूनच भारतीय संघाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. प्रक्टिस सेशनमध्ये विराट कोहलीने पकडलेल्या कॅचची चांगलीच चर्चा रंगली.
भारतीय संघ या मालिकेत तीन सामने खेळणार असून त्यातील पहिला सामना उद्या बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघांनी कसून तयारी केली आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामीवर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी एकत्रित फिल्डिंगचा सराव केला. यावेळी स्लिपमधील कॅचचा सराव करताना विराट कोहलीने अप्रतिम झेल टिपला. वेगाने आलेला चेंडू जमिनीपासून थोडाच वर होता पण विराटने चपळतेने चेंडू झेलला. प्रक्टिस सेशल पाहायला आलेल्या एका चाहत्याने याचा व्हिडीओ पोस्ट केला असून तो व्हायरल झाला आहे.
भारतासाठी ही मालिका जिंकणे महत्त्वाचे आहे. तसेच न्यूझीलंडच्या संघासाठीदेखील ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी अफगाणिस्तान विरूद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. तर श्रीलंकेत खेळण्यात आलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव झाला. अशा वेळी भारताविरूद्धच्या तीन सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे.