मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्यांदाच मुलं आणि भविष्यातील कुटुंबासंदर्भात भाष्य केलं आहे. माझा संपूर्ण वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न असेल. माझ्या करिअरचं, त्यात मिळवलेल्या यशाचं दडपण मुलांवर पडू नये, याची दक्षता मी घेईन, असं विराटनं एका मुलाखतीत म्हटलं. यावेळी विराट पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का आणि कुटुंबाविषयी भरभरुन बोलला. मुलांचं संगोपन करताना, ती त्यांचं भविष्य घडवत असताना, त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून मी मिळवलेल्या ट्रॉफीज घरात ठेवणार नसल्याचंही तो म्हणाला.
अनुष्का आणि विराट डिसेंबर 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाआधी आणि लग्नानंतरही अनेकदा विराट त्याच्या आयुष्यातील अनुष्काचं असलेलं महत्त्व याविषयी दिलखुलासपणे बोलला आहे. मात्र ईएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत विराटनं पहिल्यांदाच मुलांविषयी आणि भविष्यातील कुटुंबाविषयी भाष्य केलं. मला माझा संपूर्ण वेळ मुलांसाठी द्यायचा आहे. मी मिळवलेलं यश माझ्या मुलांच्या भविष्यावर दडपण आणणारं ठरु नये, असं मला वाटतं, अशा शब्दांमध्ये विराटनं बाबा झाल्यावर काय करणार, याबद्दल मोकळेपणानं संवाद साधला. मी मिळवलेल्या ट्रॉफीज घरात ठेवणार नाही. त्यामुळे मुलांवर नाहक दडपण येईल, असंही विराट पुढे म्हणाला.
'मला आयुष्य आहे. मला माझं कुटुंब आहे. भविष्यात आम्हाला मुलं होतील. माझा संपूर्ण वेळ त्यांचा असेल. याबद्दल माझ्या मनात कोणताही किंतु-परंतु नाही. माझ्या करिअरशी संबंधित कोणतीही वस्तू घरात नसेल, याची काळजी मी बाबा झाल्यावर घईन. त्यामुळे करिअरमध्ये मी मिळवलेलं यश दाखवणाऱ्या वस्तू, ट्रॉफीज मुलं मोठी होत असताना घरात ठेवणार नाही,' असं विराट म्हणाला. यावेळी विराटनं अनुष्काबद्दलदेखील भाष्य केलं. 'अनुष्काच्या सहवासात राहत असल्यापासून मला अनेक गोष्टींची जाणीव झाली. अनेक परिस्थितीत ती माझ्या मदतीला धावून आली,' असंही विराटनं म्हटलं.
Web Title: Virat Kohli talks about one thing he doesnt want in house after becoming father
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.