मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेतलं भारताचं आव्हान उपांत्य फेरीआधीच संपुष्टात आलं. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा होती. यापुढे रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असेल. विराटनं विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधीच आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता विराट कोहलीचं एकदिवसीय सामन्यांचं कर्णधारपदही जाणार असल्याची शक्यता आहे.
कोहलीच्या एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय लवकरच महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतं. २०२३ मध्ये विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्याआधी एकदिवसीय आणि टी-२० चं कर्णधारपद एकाच खेळाडूकडे असावं, असा बीसीसीआयचा विचार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विराट कोहलीचं एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपदही जाऊ शकतं.
बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला विराटच्या कर्णधारपदाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 'विराटकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व कायम ठेवलं जाईल याची शक्यता कमी आहे. त्याच्याकडे कसोटीचं कर्णदारपद निश्चितपणे असेल', असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. मर्यादित षटकांसाठी (एकदिवसीय आणि टी-२०) एकच कर्णधार असावा यासाठी बीसीसीआय आग्रही आहे. त्यामुळे २०२३ मध्ये होत असलेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेआधी विराटला एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडावं लागू शकतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान याबद्दलचा निर्णय होऊ शकतो.
रोहित शर्मा यापुढे टी-२० सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्त्व करेल. तर लोकेश राहुल उपकर्णधार असेल. 'रोहित शर्मा यापुढे टी-२० मध्ये संघाचं नेतृत्त्व करेल. ज्यावेळी रोहित ब्रेक घेईल, त्यावेळी संघाची धुरा राहुलकडे असेल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. १७ नोव्हेंबरपासून टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांना विश्रांती देण्यात आलेली नाही. भारताच्या १६ सदस्यीय संघात आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे.