Gautam Gambhir Virat Kohli Rohit Sharma, IND vs BAN 1st Test: भारतीय संघ उद्यापासून बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभूत केल्याने बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. आम्ही पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत खेळत राहिलो तर भारताला हरवू शकतो, असा विश्वास बांगलादेशच्या कर्णधाराने व्यक्त केला आहे. दुसरीकडे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर याची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्याआधी गंभीर आणि विराट यांच्यात मजेशीर गप्पा रंगल्याचे दिसून आले. गौतम गंभीरने विराटची मुलाखत घेत काही हलकेफुलके प्रश्न विचारले. त्यातच रोहित शर्माबाबत एक प्रश्न विचारण्यात आला आणि विराटने त्याचे मजेशीर उत्तर दिले.
IPL दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वितुष्ट आले होते. त्यामुळे गंभीरला संघाचे मुख्य प्रशिक्षक केल्यानंतर विराट कोहली आणि गंभीर याचे सूर जुळतील का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. पण दोनही खेळाडूंनी परिपक्वता दाखवत हेवेदावे बाजुला ठेवले. ताज्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीरने सुमारे २० मिनिटे विराट कोहलीची मुलाखत घेतली. त्यात दोघेही अनेक गोष्टींवर बोलताना दिसले. आता गंभीरच्या मुलाखतीत पुढचा पाहुणा रोहित शर्मा असणार आहे. 'रोहितला मी पहिला प्रश्न कुठला विचारावा' असे गंभीरने विराटला विचारले. त्यावर विराट म्हणाला की, रोहितला प्रश्न विचारायचा असेल तर साधा सरळ प्रश्न विचारायला हवा की सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खातोस की नाही? सकाळी ११ वाजताच्या ऐवजी रात्री ११ वाजता खात नाहीस ना... असा प्रश्न विराटने गंभीरला सुचवला.
रोहित शर्मा हा प्रचंड विसराळू स्वभावाचा आहे. त्याच्या विसरण्याच्या सवयीमुळे तो कायम मस्करीचा विषय ठरतो. रोहित शर्मा बरेचदा मोबाईल, पासपोर्ट, घड्याळ यासारख्या गोष्टी हॉटेलमध्येच विसरला आहे. इतकेच नव्हे तर एकदा तो टॉस जिंकल्यावर बॅटिंग घ्यावी की बॉलिंग हे देखील विसरला होता. याच कारणामुळे विराट कोहली त्याला सकाळी भिजवलेले बदाम खाण्याबाबत विचारेल असं म्हणाला.
दरम्यान, बांगलादेश विरूद्धच्या मालिकेत विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावतो आहे. विराट कोहलीकडे महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने केलेला एक महाकाय विक्रम मोडण्याची संधी आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटच्या ५९१ डावामध्ये मिळून एकूण २६,९४२ धावा केल्या आहेत. सर्वात जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम सचिनच्या नावे (६२३ डाव) आहे. विराटने ५८ धावा केल्यास सचिनचा हा विक्रम विराट मोडू शकतो.