Virat Kohli Test Captain: विराट कोहलीने भारतीय संघाचं कसोटी कर्णधारपद अचानक सोडून क्रिकेटजगताला धक्का दिला. शनिवारी त्याने अचानक हा निर्णय आपल्या सोशल मीडियावरून जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २-१ असा कसोटी मालिका पराभव झाल्यानंतर त्याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घोषित केला. विराटला वन डे कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर विराट आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात मतभेद असल्याचं जाणवलं होतं. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर गांगुलीने ट्विटरवरून आपल्या भावना मांडल्या आणि स्पष्टीकरणही दिलं.
सौरव गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये कसोटी कर्णधारपद सोडणं हा विराटचा वैयक्तिक निर्णय असल्याचे प्रामुख्याने स्पष्ट केलं. "विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये झपाट्याने प्रगती केली. त्याचा (कर्णधारपद सोडण्याचा) निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा आदर करते. भविष्यात या संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी विराट संघाचा खेळाडू आणि टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य या नात्याने नक्कीच प्रयत्नशील असेल. तो एक महान खेळाडू आहे", अशा शब्दांत गांगुलीने विराटच्या राजीनाम्यावर भावना व्यक्त केल्या.
बीसीसीआय सचिव जय शाह काय म्हणाले?
विराटच्या राजीनाम्यानंतर सचिव जय शाह यांनीही आपलं मत व्यक्त केलं. "भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटनं असा निर्भिड संघ तयार केला की जो घरातच नव्हे तर घराबाहेरही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्याची धमक राखतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे मिळवलेले कसोटी विजय हे खास आहेत'', असे सचिव जय शाह यांनी ANI शी बोलताना सांगितलं.