Jay Shah on Virat Kohli Test captaicy decision : मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली होती. त्या दौऱ्यावरील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर संघातील वातावरण बदलल्याचे म्हटले गेले. त्यात आर अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावर बसवून ठेवले गेले. त्यानंतर काही सीनियर खेळाडूंनी विराटची तक्रार बीसीसीआयकडे केल्याच्या बातम्या आल्या. या सर्व घडामोडींवर कुणी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी कुछ गडबड है दया!, हे नक्की होतं. त्यानंतर दोन महिन्यानंतर विराट कोहलीनं धडाधड राजीनाम्याचा सपाटा लावला.
याही निर्णयाबाबत ९० मिनिटांच्या बैठकीच्या अखेरीस सांगितल्याचा गौप्यस्फोट विराटनं केला. त्यानंतर बीसीसीआयकडून अनेक बचावात्मक स्टेटमेंट आल्या. पण, नेमकं खरं कोण बोलतंय हेच अजूनही कळलेले नाही. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनीही पत्रकार परिषदेत विराटचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला. आता या सामन्याचा पुढील अंक विराटच्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर चालणार असं दिसतंय.
बीसीसीआय सचिव जय शाह काय म्हणाले?भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटनं असा निडर संघ तयार केला की जो घरात आणि घराबाहेर कोणत्याही प्रतिस्पर्धीला टक्कर देण्याची धमक राखतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे मिळवलेले कसोटी विजय हे खास आहेत,'' असे जय शाह यांनी ANI शी बोलताना म्हटले.