AB De Villiers on Virat Kohli Test Captain: टीम इंडियाची रनमशिन समजला जाणारा विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. तशातच गेल्या चार-पाच महिन्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत विचित्र प्रकार घडताना दिसले. सर्वप्रथम टी२० विश्वचषक स्पर्धेआधीच त्याने टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याला वन डे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. अखेरीस आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. विराट आणि बीसीसीआय यांच्यातील शीतयुद्ध या घटनाक्रमाला कारणीभूत असल्याचं काही क्रिकेट जाणकार सांगत आहेत. पण विराटच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला साऱ्यांनीच सलाम केला. विराटचा RCB मधील खास मित्र एबी डीव्हिलियर्स यानेही विराटचं कौतुक केलं.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतीय संघ कसोटी मालिकेत १-०ने आघाडीवर होता. पण पुढील दोन्ही सामने आफ्रिकेने उत्तम फलंदाजीच्या जोरावर जिंकले. त्यानंतर अचानक शनिवारी विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ट्विटरवर त्याने एक पोस्ट ट्वीट करत अधिकृत घोषणा केली. विराटचा तडकाफडकी राजीनामा हा क्रिकेटविश्वाशी एक धक्काच होता. पण साऱ्यांनी त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला शुभेच्छा दिल्या. विराटचा RCB मधील खास भिडू डीव्हिलियर्स याने एका वाक्यात विराटच्या या निर्णयावर कमेंट केली. 'विराट, कर्णधार म्हणून तुझी कामगिरी खूपच अप्रतिम होती. तू कर्णधारपद एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंस', अशी मोजक्या शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने मात्र थोडं वेगळ्या आशयाचं मत व्यक्त केलं. प्रत्येकाला कधी ना कधी कर्णधारपद सोडावं लागतंच असा विचार त्याने मांडला. ''कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो. महेंद्रसिंग धोनीसारख्या यशस्वी कर्णधारानेही त्याच्या खांद्यावरील जबाबदारी विराटच्या खांद्यावर दिली होती आणि मग तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. धोनीने ICC आयोजित अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. असं असताना त्यालाही कर्णधारपद सोडावं लागलंच होतं. त्यामुळे विराटने आता चर्चांमध्ये अडकून न राहता धावा करण्यावर लक्ष द्यायला हवं", असं स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केलं.