Virat Kohli Unseen Photos: २० जून ही तारीख भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. या दिवशी माजी कर्णधार सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी कसोटी पदार्पण केले. गांगुली आणि द्रविड यांनी १९९६ मध्ये लॉर्ड्स कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर १५ वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये कोहलीने किंग्स्टन कसोटीतून पदार्पण केले. माजी कर्णधार विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीला आज ११ वर्षे पूर्ण झाली. यावेळी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील काही संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. महत्त्वाची बाब म्हणजे, विराटने थेट आपल्या लॅपटॉपमधील फोटोज चाहत्यांसाठी खुले केले. त्यात काही आधी न पोस्ट केलेले फोटोही दिसले.
विराट कोहलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोहलीने व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे की 'वेळ कसा निघून जातो कळतच नाही.' विराट कोहलीने शेअर केलेला व्हिडिओ डेस्कटॉपच्या स्क्रीनसारखा आहे. जिथे पासवर्ड टाकताच स्क्रीन दिसतो. मग तो कसोटी सामन्याच्या फोल्डरमध्ये जातो. त्यात ११ वर्षांच्या कारकिर्दीची खास छायाचित्रे असतात, त्याचा स्लाईड-शो त्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसू लागतो. पाहा व्हिडीओ-
विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो डांबुलामध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला. तीन वर्षांनंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कोहलीने २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. हा सामना किंग्स्टन येथे झाला. पदार्पणाच्या कसोटीत कोहलीने अनुक्रमे ४ आणि १५ धावा केल्या. भारतीय संघाने ही कसोटी ६३ धावांनी जिंकली होती.