नवी दिल्ली: विराट कोहली टी-२० तून तात्पुरता ब्रेक घेणार आहे. तो आता वनडे आणि कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. कोहली टी-२० क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. विराट कोहली शक्यतो आयपीएल २०२३ पर्यंत भारताकडून टी-२० खेळणार नाही. याबाबत त्याने बीसीसीआयला अद्याप काही सांगितलेले नाही.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘होय, विराट कोहलीने तो टी-२० साठी उपलब्ध असणार नाही असे कळवले आहे. तो श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका खेळेल. त्याने टी-२० मधून ब्रेक घेतला आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र तो महत्त्वाच्या मालिकांसाठी प्लॅन करतोय. रोहितबाबत बोलायचे तर आम्ही रोहितच्या दुखापतीबाबत घाई करणार नाही. त्यामुळे तो फिट आहे की नाही याबाबत आम्ही आताच काही ठरवणार नाही. तो फलंदाजी करतो मात्र आम्हाला क्षेत्ररक्षणात कोणताही धोका पत्करायचा नाही.’
भारताचा २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघ तयार करताना विराट कोहलीचा हा ब्रेक निवड समितीच्या पथ्यावर पडणारा आहे. सध्या भारतीय संघ व्यवस्थापन टी-२० संघाची नव्याने बांधणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे टी-२० संघातून रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. निवड समिती नव्या खेळाडूंना आजमावून पाहणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"