Join us  

कोहलीचा नेतृत्व सोडण्याचा निर्णय समजूतदारीचा- रवी शास्त्री

तिन्ही प्रकारात नेतृत्व करणे सोपी गोष्ट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:58 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहलीचा क्रिकेटच्या सर्व प्रकारातून नेतृत्व सोडण्याचा निर्णय अतिशय समजूतदारीचा होता. यामुळे आगामी आयपीएलमध्ये त्याचा कामगिरीचा मार्ग मोकळा झाल्याचे मत भारतीय संघाचे माजी मुख्य राष्ट्रीय कोच रवी शास्त्री यांनी गुरुवारी व्यक्त केले.कोच असताना कोहलीचे नेतृत्वकाैशल्य जवळून पाहणारे आणि मार्गदर्शन करणारे शास्त्री यांनी ३३ वर्षांचा कोहली अजून काही दिवस कसोटी संघाच्या कर्णधारपदी राहायला हवा होता, असेही मत मांडले. ते म्हणाले,‘ प्रामाणिकपणे सांगायाचे तर  नेतृत्व सोडणे अप्रत्यक्षरीत्या लाभदायी असते. नेतृत्वाचे ओझे खांद्यावरून खाली येते.  त्याच्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली जात होती, ती आता बाळगली जाणार नाही.तो स्वत:ला आणखी चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकेल.  कोहली आता मोकळेपणे फटकेबाजी करीत धावडोंगर उभारू शकेल, असा मला विश्वास आहे.’ कोहलीने आयपीएलमधील आरसीबीचे कर्णधारपद देखील सोडले आहे. त्यानंतर द. आफ्रिकेत १-२ ने कसोटी मालिका गमावताच त्याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडले.  त्याआधी टी-२० विश्वचषकानंतर या प्रकाराचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा केली होती. हे घडत असताना बीसीसीआयने त्याची वन डे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी केली.‘कोहलीने स्वत:च्या कामगिरीबाबत अधिक चिंता बाळगण्याची गरज नाही.  त्याने जागतिक क्रिकेटमध्ये आधीच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बराच पल्ला गाठला आहे.  भारतीय संघाचे नेतृत्व करणे हेच मोठे आव्हान आहे.  तिन्ही प्रकारात एकाच व्यक्तीने नेतृत्व करणे सोपी गोष्ट नाही. भारतीय कर्णधाराकडून तर मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. भारतीय कर्णधारपदाच्या तुलनेत इतर देशांच्या कर्णधाराला इतक्या दडपणाचा कधीही सामना करावा लागत नाही. येथे मात्र एक अब्जाहून अधिक लोकांच्या आशाआकांक्षाची पूर्तता करावी लागते. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाण्याची अधिक भीती मनात असते.’असे मत शास्त्री यांनी कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत व्यक्त केले.‘माझ्यामते  कर्णधारपद सोडण्याचा कोहलीचा निर्णय समजूतदारपणाचा होता.  कसोटी कर्णधारपद कायम राखले असते तरी मला चांगले वाटले असते, मात्र तो कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे, ’ असे शास्त्री यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री
Open in App