Join us  

कोहलीची 'विराट'झेप! कसोटी क्रमवारीत गाठले अव्वलस्थान

भारताचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीने अखेर फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 12:41 PM

Open in App

दुबई - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र ही कसोटी चांगलीच फलदायी ठरली आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डवात अर्धशतक फटकावत विराटने अखेर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठण्यात यश मिळवले आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दमदार फलंदाजीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानाला गवसणी घातली. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट हा भारताचा केवळ सातवा फलंदाज आहे. 

 

इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टन कसोटीत विराटने पहिल्या डावात 149 धावांची झुंजार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला कसोटीत पुनरागमन करता आले होते. त्यानंतर दुसऱ्या डावातही एकाकी खिंड लढवत त्याने 51 धावा फटकावल्या होत्या. मात्र त्याच्या झुंजार खेळानंतरही भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकला नव्हता. विराट बाद झाल्यानंतर शेपूट झटपट गुंडाळले गेल्याने भारतीय संघ पराभूत झाला होता. मात्र दमदार फलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावण्याचा विराटचा मार्ग मोकळा झाला.  स्मिथला मागे टाकून कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा 2011 नंतरचा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याआधी 2011 साली सचिन तेंडुलकर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. विराटपूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि  दिलीप वेंगसरकर यांनाच कसोटी क्रमवारील अव्वलस्थान पटकावण्याची किमया साधता आली होती. 

 

बॉल टेम्परिंगच्या आरोपामुळे बंदीची शिक्षा भोगत असलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्हन स्मिथ 2015 पासून कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानावर होता. मात्र आता विराटने त्याच्यापेक्षा पाच गुण अधिक घेत अव्वलस्थान पटकावले आहे. 

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघआयसीसी