BCCI, Indian Team: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर BCCI आणि भारतीय क्रिकेटपटू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंची पाकिस्तानी खेळासोबत असलेली मैत्री. बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंवर पाकिस्तानसोबत सामने खेळण्यावरुन टीका होत आहे.
अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन अधिकारी आणि एक जम्मू-काश्मीर पोलिस अधिकारी शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली असून ती सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मॅचनंतर बाबर आझम आणि शादाब खानला भेटलेल्या विराट कोहलीला चाहते ट्रोल करत आहेत. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, असे अनेकांचे मत आहे. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले राजीव शुक्ला?एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राजीव शुक्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलली जावीत, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, गेल्या 20 वर्षांत प्रत्येक सरकारने दहशतवादाविरोधात लढा दिला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे दहशतवादाला पाठिंबा देणे त्यांच्यासाठी आणि जगासाठीही चांगले नाही. क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर, भारत पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, असे स्पष्ट धोरण आहे, अशी माहिती शुक्ला यांनी दिली.
11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली नाहीभारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका गेल्या 11 वर्षांपासून बंद आहे. हे दोन संघ फक्त आशिया चषक किंवा विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. सध्या खेळल्या जात असलेल्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु बीसीसीआयने स्पष्टपणे नकार दिला होता की, आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत आणि त्यामुळे आशिया चषकाचे बहुतांश सामने श्रीलंकेत होत आहेत.