Virat Rahul Photo: विराट कोहली आणि कर्णधारपद हे जणू काही समानार्थी शब्दांप्रमाणेच आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने अनेक वर्षे संघाचं नेतृत्व केलं. कोहलीने टीम इंडियामध्ये आक्रमकपणा आणि आत्मविश्वास भरला. तसंच शेवटपर्यंत हार न मानण्याचा अॅटीट्यूडदेखील निर्माण केला. अनेक नव्या दमाच्या खेळाडूंसाठी कोहली प्रेरणास्थान ठरला. पण आता आफ्रिकेविरूद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेपासून विराट कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार नाही. त्याची सुरूवात सराव सत्रातच दिसून आली.
विराटने कर्णधारपदाचा राजीनाम दिल्यानंतर विराट संघात असताना भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले असले तरी तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशी परिस्थितीत भारताचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. वन डे मालिकेआधी भारताने राहुलच्या नेतृत्वाखाली आपलं पहिलं सराव सत्र खेळले. या सत्रात राहुलने आपल्या सहकाऱ्यांना वन डे मालिकेतील प्लॅन कसा असावा, याबद्दल माहिती दिली. संघातील खेळाडू वर्तुळाकार आकारात उभे राहुन (Team Huddle) राहुलचं म्हणणं नीट शांतपणे ऐकताना दिसले. या सहकाऱ्यांमध्ये विराट देखील उभा असल्याने हा फोटो चांगलाच चर्चेत आला.
राहुलने आपल्या सहकाऱ्यांशी सराव सत्रात संवाद साधला आणि संघाची रणनिती कशी असेल याबद्दल माहिती सांगितली. मैदानात आणि खेळाडूंमध्ये नेहमी आक्रमक असणारा आणि बरेचदा आरडाओरडा करणारा माजी कर्णधार विराट कोहलीदेखील राहुलचं म्हणणं शांतपणे ऐकताना दिसला. BCCI ने हे फोटो पोस्ट केले. फॅन्सने या फोटोत विराटमध्ये झालेला हा बदल लगेचच टिपला. विराटच्या या वेगळ्याच भूमिकेची क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे.
भारताची आफ्रिकेविरूद्ध उद्यापासून वन डे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारीला, दुसरा २१ जानेवारीला आणि तिसरा सामना २३ जानेवारीला होणार आहे. या मालिकेसाठी स्टार फलंदाज रोहित शर्मा संघात नसेल. त्यामुळे राहुलसोबत सलामीला कोण येणार याबाबत अनेक चर्चा आहेत. निवड समितीने जाहीर केलेल्या संघात शिखर धवन, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड असे तीन पर्याय संघ व्यवस्थापनापुढे उपलब्ध असणार आहेत.