भारतीय संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहली हा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग कमावणारा चेहरा आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बहुतांशवेळा तो जाहिरातीतूनच झळकतो. अधून मधून तो क्रिकेटसंदर्भताील काही खास पोस्टही शेअर करत असतो. पण यावेळी एका शब्दांतील ३ लागोपाठ केलेल्या पोस्टमुळे त्याने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी किंग कोहलीनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
विराट कोहलीची एका शब्दांतील ३ ट्विटवाली पोस्ट चर्चेत
विराट कोहलीनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली की, चाहते अगदी उत्सकतेनं पोस्टवर लाईक्स कमेंट्सची बरसात करत असतात. विराट कोहलीच्या मोजक्या शब्दांतील खास ट्विटलाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याच्या ट्विटनं अल्पावधित मिलियनचा आकडाही गाठला. पण गंमत अशी की, विराट कोहलीनं एका शब्दांतील ३ ट्विट मागची गोष्ट चाहत्यांना कळण्यापलिकडची होती.
काय होती किंग कोहलीनं चाहत्यांना कोड्यात टाकलेली ती पोस्ट?
विराट कोहलीला या ट्विटमधून नेमकं काय सांगायचं आहे? असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडला. भारतीय स्टार क्रिकेटरनं एक्स अकाउंटवरुन एका पाठोपाठ एक केलेल्या ट्विटमध्ये दयाळूपणा (Kindness), स्त्रियांबाबत आदर दाखविणारी पुरुषांची विनम्र आणि दयापूर्ण वृत्ती (Chivalry ), आदर (Respect) या तीन शब्दांचा उल्लेख केला आहे. चाहते त्याच्या ट्विटचा वेगवेगळा अर्थ काढत असताना खुद्द विराटनं आणखी एका पोस्टसह हे कोड स्वत:च सोडवलं आहे.
काही वेळात विराटनंच सोडवलं ते कोडं
लागोपाठ तीन ट्विटनंतर क्रिकेटरनं एक व्हिडिओ पोस्ट शेअर केल आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केलेल्या मोजक्या शब्दांतील ट्विटचं उत्तर मिळतं. या व्हिडिओमध्ये किंग कोहली Wrogn या लोकप्रिय युवा फॅशन ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. हा ब्रँड विराट कोहली सह निर्मित आहे. आधीच्या ट्विटमध्ये त्याने ज्या शब्दांचा उल्लेख केला त्या शब्दांमागची नेमकी गोष्ट काय? ते तुम्हाला विराट कोहलीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजेल.