Join us  

Virat Kohli: तीन दिवसांत दोन मोठे निर्णय!; विराट कोहलीच्या निर्णयामागे नेमकं दडलंय काय?

Virat Kohli: विराट कोहली तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा होतो, यात काही नवीन नाही. पण, त्याच्या या दोन निर्णयांमागे कोणतीच घाई गडबडी नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2021 8:03 PM

Open in App

- स्वदेश घाणेकर भारतीय संघचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं 16 सप्टेंबरला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचे जाहीर केले अन् आयपीएल 2021 ( IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यापूर्वी गुगली टाकली. विराट कोहली तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा होतो, यात काही नवीन नाही. पण, त्याच्या या दोन निर्णयांमागे कोणतीच घाई गडबडी नाही. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचा सपाटा लावला असला तरी आयसीसी स्पर्धांमधील त्याच्या नेतृत्वाचा इतिहास पाडता यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप त्याच्या डोक्यावर काटेरी मुकूट घेऊनच आला होता. यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश हे आतापर्यंतच्या सर्व यशांवर पाणी फिरवणारे ठरेल की काय, ही भीती सतत विराटच्या मनात होती. त्यात आयसीसी स्पर्धांमधील विराटला अद्याप न मिळालेले यश हे बीसीसीआयच्या चिंतेचा विषय होताच, त्यामुळे डोक्यावरील कर्णधारपद जाण्याची टांगती तलवार विराटनं आधीच ओळखली. (Two big decisions in three days !; What exactly is behind Virat Kohli's decision?)

महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर विराटनं तिन्ही फॉरमॅटमध्ये सक्षमपणे टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले. कसोटी क्रिकेटमध्ये तर टीम इंडियानं एकेक करून अनेक विक्रमांची नोंद केली. 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत नमवण्याचा विक्रमही विराटनेच केला. सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्यानंतर टीम इंडियाला मिळालेला आक्रमक कर्णधाराचा तो अपडेट व्हर्जन होता. समोरच्या नडायचं अन् भिडायचं एवढंच त्याला माहित्येय. पण, मैदानावरील ही आक्रमकता प्रतिस्पर्धीपूर्ती मर्यादित असती तर ठिक होती. आपल्या सहकाऱ्यांचं ऐकायचं नाही, मी बोलेन तेच खरं. मी सांगेन तिच पूर्व दिशा आणि मी फक्त मैदानावर असेपर्यंतच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधिल... या काही दुर्गुणांमुळे बीसीसीआय हैराण झाले होते.

टीम निवडीतही मी सांगेन तो खेळाडू संघात असायलाच हवा, हा त्याचा हट्ट. बीसीसीआय मागील 4-5 वर्ष हे सहन करत होते. पण, फेब्रुवारी-मार्च महिन्यात वादाची ठिणगी पडली अन् विराटच्या एकाधिकारशाहीला आव्हान देण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा ( Rohit Sharma) देण्यात येईल अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जाऊ लागल्या. त्यात विराटचे फेव्हरिट कोच रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनीही ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षकपद नकोच, हाच पवित्रा घेतल्यानंतर त्याची आणखी गोची झाली. त्यात पुढे बीसीसीआयनं आणखी मोठा डाव टाकला. शास्त्रीनंतर मुख्य प्रशिक्षकपदावर अऩिल कुंबळे ( Anil Kumble) यांना पुन्हा बोलावण्याचा. 2017 मध्ये याच कुंबळे यांना विराटनं लॉबी तयार करत शास्त्रींना आणले. आता तेच कुंबळे डोक्यावर बसल्यावर नसता मनस्ताप होईल. त्यामुळेच केवळ फलंदाज म्हणूनच ट्वेंटी-20त खेळावे हे त्यानं योग्य समजले.

असे असले तरी वन डे व कसोटीत तो कर्णधार कायम राहील, पण किती काळ?; आताच्या माहितीनुसार अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षक झालेच, तर त्यांच्यासोबत विराट किती जुळवून घेईल, हे आताच सांगणे अवघड आहे. पुढील 3-4 वर्षांत आयसीसीच्या बऱ्याच प्रमुख स्पर्धा आहेत, त्यात भारतात होणारा वन डे वर्ल्ड कपही आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या खेळीनं विराट आधीच सावध झाला आहे आणि त्यातूनच त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय झाला आहे. यानं झालं असं की जर वर्ल्ड कपमध्ये अपयश आलंच, तर बीसीसीआयला आता विराटची हकालपट्टी करण्याची घोषणा करावी लागणार नाही. आता टीम इंडियातील सहकारी विराटला विजयी निरोप देण्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आणखी जोमानं खेळतील. याला एका बाणात दोन शिकार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

RCBचे कर्णधारपद का सोडले, ना तिथे कुंबळे होते ना बीसीसीआय?विराटनं टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व सोडले, मग तो RCBचेही नेतृत्व सोडणार का, अशी चर्चा लगेच सुरू झाली. समालोचक हर्षा भोगले ( Harsha Bhogle) यांनी तर विराट आधी RCBचे कर्णधारपद सोडेल, असे वाटले होते, असा खोचक टोमणा मारला होता. आयपीएलमध्येही विराटला कर्णधार म्हणून फार चांगली कामगिरी करणे जमलेले नाही. 2016 ला जेतेपदापर्यंत पोहोचले, परंतु रित्या हातानी मागे फिरले. 2013 पासून तो आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु 8 वर्षांत एकही जेतेपद त्याला जिंकता आलेले नाही. त्यात त्याचा प्रतिस्पर्धी रोहित शर्मा पाच जेतेपदं घेऊन जातो. त्यामुळे त्याच्यावरील दडपणही यंदा वाढले आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबीसीसीआय
Open in App