मुंबईः क्रिकेटमधील विक्रम मोडण्याची जणू सवयच लागलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज टी-२० क्रिकेटमध्ये एक 'विराट' विक्रम रचू शकतो. एकाच संघासाठी ५००० धावा करण्याचा पराक्रम आजपर्यंत जगातील एकाही फलंदाजाला जमलेला नाही. विराटने आज मुंबईविरुद्धच्या सामन्यात ४९ धावा केल्यास तो ही अद्मुत किमया करू शकतो.
आयपीएल-११ मधील पहिल्या विजयाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी आहे. बेंगळुरूला आत्तापर्यंत तीनपैकी एकच सामना जिंकता आलाय. त्यामुळे या दोन तुल्यबळ संघांमध्ये चुरशीची लढाई होणार आहे. त्यासोबतच, विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा असा 'रन'संग्राम रंगेल. त्यात विराट कोहलीनं ४९ धावा केल्यास त्याच्या शिरपेचात 'पाच हजारी मनसबदारा'चा तुरा खोवला जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी विराट कोहलीनं १५८ डावांत ४९५१ धावा केल्यात. त्यात ४९ धावांची भर पडली तर त्याच्या ५००० धावा पूर्ण होतील आणि एकाच संघाकडून खेळताना हा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरेल.
कोहली २००८ पासून आरसीबीचा शिलेदार आहे. आयपीएल स्पर्धेत त्यानं बेंगळुरूकडून १५२ सामन्यांतील १४४ डावांत ४,५२७ धावा केल्यात. त्याशिवाय, २००९ ते २०११ दरम्यान आरसीबीसाठीच चॅम्पियन्स लीगमध्ये १४ डावात ४२४ धावा फटकावल्यात.
दोन दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं ३० चेंडूत ५७ धावांची झंझावाती खेळी केली होती. या अर्धशतकामुळे त्यानं आयपीएलमध्ये ४५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. सुरेश रैनानंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. आता आज ४९ धावा करून तो आणखी एक मैलाचा दगड गाठतो का, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे.