आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करत धावांचा डोंगर उभारला आहे. मात्रा हा सामना अविस्मरणीय ठरलाय तो विराट कोहलीने केलेल्या ऐतिहासिक खेळीमुळे. विराट कोहलीने शतकी खेळी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडवर मात करणार का? आणि या सामन्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडणार का? हे दोन प्रश्न मनात घेऊन आज क्रिकेटप्रेमी वानखेडेवर आले होते.
दरम्यान, संघाला स्फोटक सुरुवात देऊन रोहित शर्मा माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी विराट... विराट... असा गजर करत संपूर्ण वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. यावेळी आवाजाने ११८ डेसिबलची वेस ओलांडली होती. एकेरी-दुहेरी धावांबरोबरच विराटच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक चौकाराबरोबर वानखेडेवरील चाहत्यांचा उत्साह वाढत होता. विराट जसजशी शकताच्या दिशेने कूच करू लागला तसा वानखेडेवरील क्रिकेटप्रेमींचा आवाजही वाढू लागला. अखेरीस लॉकी फर्ग्युसनने टाकलेल्या ४२ व्या षटकामध्ये विराट कोहलीने चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत ऐतिहासिक शतकाला गवसणी घातली.
शतक पूर्ण होताच विराटने अभिवादन करताना सचिन तेंडुलकरच्या दिशेने जात मुजरा केला. तसेच पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिला. यादरम्यान, मैदानावर चाहत्यांचा आवाज टिपेला होता. यावेळी तब्बल १२१ डीबी आवाजाची नोंद झाली होती. तर सचिन तेंडुलकरसह बीसीयीआचे अध्यक्ष रॉजर बिन्न यांच्यासह जय शाह, आशीष शेलार यांनीही विराट कोहलीला स्टँडिंग ओवेशन दिले.