Virat Kohli vs BCCI : विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय हा वाद आणखी चिघळत चालला आहे. काही जणं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या, तर काही विराट कोहलीच्या समर्थनात सोशल मीडियावर फटकेबाजी करत आहे. पण, आता बीसीसीआयला घरचा आहेर मिळाला आहे. भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद ( Kirti Azad) यांनी निवड समितीवर निशाणा साधताना चांगली फटकेबाजी केली आहे. विराट जेवढे सामने खेळला आहे, त्यापेक्षा निम्मेही निवड समितीच्या सदस्यांनी मिळून खेळले नसतील, अशी टीका त्यांनी केली. विराटला वन डे कर्णधारपदावरून काढताना निवड समितीनं योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
माजी क्रिकेटपटू आणि आता राजकारणात सक्रिय असलेले आझाद म्हणाले,''निवड समितीनं विराटला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांनी आधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे जायला हवं होतं. त्याच्या मान्यतेनंतरच हा निर्णय जाहीर करायला हवा होता.''
''निवड समितीनं त्यांनी ठरवलेला निर्णय बीसीसीआय अध्यक्षापुढे मांडायला हवा होता. जेव्ह मी निवड समितीत होतो तेव्हा आम्ही संघजरी निवडला तरी त्याच्या मान्यतेसाठी बीसीसीआय अध्यक्षाकडे जायचो. ते त्यावर सही करायचे आणि नंतर आम्ही संघ जाहीर करायचो, '' हेही त्यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर करण्याच्या एक तास आधी तुम्ही विराटला वन डे कर्णधारपदावरून काढून टाकता, ही चुकीची गोष्ट आहे. यानं त्याच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या असतील, असे आझाद म्हणाले. '' कर्णधारपदाबाबतचा निर्णय घेताना तुम्ही तो लेखी स्वरूपात अध्यक्षांना कळवायला हवा होता. विराट दुःखी नाही झालाय, परंतु त्याला ज्या पद्धतीनं हे सांगण्यात आलं त्यानं त्याच्या भावना दुखावल्या गेल्यात. निवड समितीतील सर्व सदस्य चांगली आहेत, परंतु त्यांनी खेळलेल्या एकूण क्रिकेट सामन्यांची संख्या ही विराटच्या सामन्यांच्या निम्मीपण नाही.''
सौरव गांगुली काय म्हणाला अन् विराट काय म्हणतोय?
- गांगुलीनं ९ डिसेंबरला सांगितलं होतं की, विराट कोहलीला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस अशी विनंती मी केली होती आणि त्यानं ती नाही ऐकली.
- त्यावर विराट म्हणाला, कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. मला कोणीही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केलेली नाही. BCCI कडून या निर्णयाबाबत माझ्याशी कुणीच चर्चा केली नाही . माझा निर्णय त्यांनी मान्य केला आणि हा काही गुन्हा नाही.