कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या घणाघातामुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे. आता या वादातून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआय काही पर्यार्यांवर विचार करत आहे. तसेच मैदानाबाहेर घडत असलेल्या घडामोडींचा संघावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. दरम्यान, विराट कोहलीसोबतच्या वादावर बीसीसीआयने आस्ते कदम भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे सध्यातरी या वादावर बीसीसीआयचा कुठलाही पदाधिकारी बोलणार नाही. तसेच कुठल्याही पत्रकार परिषदेचे आयोजनही होणार नाही. कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्षांमधील वादावर सौहार्दपूर्ण तोडगा निघावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार आणि अध्यक्षांमध्ये तीव्र मतभेद झाल्याची उदाहरणे क्वचितच दिसतात. मात्र बुधवारी जे काही झाले त्यामुळे बीसीसीआयमध्ये तीव्र नाराजी आहे. पण यावर त्वरित तोडगा काढण्यासाठीची कठोर कारवाई नुकसानकारक ठरू शकते. या विषयावर सौरव गांगुली आणि जय शाह यांनी झूमवरून चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. तर या वादावर आपण कुठलेही सार्वजनिक विधान करणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. ‘मी भाष्य करणार नाही. माझ्याकडे आधीच सांगितलेल्या गोष्टींपेक्षा अतिरिक्त काहीच नाही आणि फक्त बीसीसीआय हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळेल,’ इतकेच गांगुली म्हणाले.
भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या वादाची जगभरात चर्चा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने मोठा खुलासा केला. एकाप्रकारे विराट कोहलीने बीसीसीआयच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर गुरुवारी बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने भारतीय कसोटी आणि वन डे संघाचा कर्णधार राहील; पण टी-२० संघाचा कर्णधार राहणार नाही, अशी घोषणा केली होती.
कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्षांमधील वादावर तोडगा हा दोघांनी एकत्र बसून मतभेद आणि संवादहीनतेवर सौहार्दपूर्ण पद्धतीने मार्ग काढण्याचा असेल. सामान्यपणे करारबद्ध खेळाडूकडून संस्था किंवा पदाधिकाऱ्यांविरोधात टीका टिप्पणीची अपेक्षा केली जात नाही. मात्र कोहलीकडून जे काही घडले ती प्रश्नाला उत्तर म्हणून दिलेली प्रतिक्रिया ही नियमभंग ठरतो की नाही हासुद्धा एक प्रश्नच आहे. त्यामुळे या वादावर सहजासहजी तोडगा निघणार नाही.