Virat Kohli vs BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांना ढवळून काढणारी पत्रकार परिषद बुधवारी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) घेतली. दक्षिण आफ्रिका दौरा, वन डे संघाचे नेतृत्व, रोहित शर्माशी वाद या सर्व प्रश्नांची विराटनं सडेतोड उत्तरं दिली. पण, त्याच्या उत्तरानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला खोटारडं ठरवलं. त्यामुळे आता सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली हा सामना रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. विराटच्या दाव्यानंतर महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी गांगुलीला फटकारले आहे आणि दोघांच्या विधानात ही विसंगती का, हे गांगुलीला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटला हा निर्णय घेऊ नकोस अशी विनंती केली होती, परंतु त्यानं ती ऐकली नाही, असा दावा गांगुलीनं केला. पण, विराटनं बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशी कोणतीही विनंती किंवा विचारणा मला करण्यात आली नव्हती, हे स्पष्ट केलं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतंय हे चाहत्यांना कळेनासे झाले आहे. विराटच्या या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर निवड समिती प्रमुख चेतन शर्मा सायंकाळी पत्रकारांना सामोरे जाणार होते, परंतु त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली. विराटच्या विधानांवर अद्याप बीसीसीआयकडून कोणतिच प्रतिक्रिया आलेली नाही.
विराट आणि गांगुली यांच्या परस्परविरोधी विधानानंतर गावस्करांनी या वादात उडी मारली आहे. ते म्हणाले,''विराट कोहलीच्या विधानामुळे BCCI चर्चेत आलीय असं मला वाटत नाही. माझ्या मते ज्या व्यक्तीनं त्याला विचारणा केल्याचा दावा केला आहे, त्यानं खरं खोटं सांगायला हवं आणि ती व्यक्ती बीसीसीआय अध्यक्ष गांगुली ही आहे. त्यामुळे ही विसंगती का, याचे उत्तर त्यानं द्यायला हवं. या विसंगतीचं उत्तर देणारी योग्य व्यक्ती गांगुलीच आहे. ''
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा यानंही खेळाडू व संघ व्यवस्थापनात पारदर्शकता असायला हवी, असे मत मांडले आहे. वन डे कर्णधारपद काढून घेताना बीसीसीआयकडून योग्य संवाद साधला गेला नाही, विराटच्या या विधानावर मिश्रानं त्याचं मत व्यक्त केलं. ''हे असं पहिल्यांदाच घडत नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या. खेळाडू अथक मेहनत घेऊन देशासाठी खेळतो आणि त्याच्यासोबत असं झाल्यानं वाईट वाटते. खेळाडूला संघाबाहेर का केलं जातं याचे उत्तर जाणून घेणे हा त्याचा अधिकार आहे,'' असे मिश्रा म्हणाला.