दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) पत्रकार परिषदेत फटाके फोडले अन् BCCIला तोंडावर आपटले. त्यानंतर बीसीसीआयकडून कोणती प्रतिक्रिया येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी ( Chetan Sharma) शुक्रवारी मौन सोडले. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना बीसीसीआय किंवा अन्य कोणाकडूनही या निर्णयाचा पुनर्विचार कर अशी विनंती करण्यात आली नसल्याचे विराटनं सांगितले. त्याचा हा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या विरुद्ध होते.
चेतन शर्मान यांनी यांनी याबाबत खुलासा केला. विराटच्या या निर्णयाचा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि त्याला या निर्णयाचा पुनर्विचार कर असे त्याला सांगितले होते. त्याच्या या निर्णयाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल, असे निवड समितीला वाटत होते. शर्मा म्हणाले,''वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना विराटच्या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या बैठकीत उपस्थित प्रत्येक जण त्याला या निर्णयाचा पुन्हा विचार कर, असेच सांगत होते. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर यावर चर्चा करू असेही त्याला सांगण्यात आले होते. कारण, त्याच्या या निर्णयाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल, असे आम्हाला वाटत होते.''
मीडियानं उगाच वाद निर्माण करणारे वार्तांकन करू नये असे आवाहन चेतन शर्मा यांनी केले. विराट कोहलीच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून कम्युनिकेशन गॅप नक्कीच नव्हता, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. चेतन शर्मा म्हणाले,''विराट व रोहित या दोघांमध्ये सर्वकाही चांगलं आहे. त्यामुळेच मी सांगतोय की अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपण सर्वप्रथम क्रिकेटपटू आहोत आणि निवड समिती सदस्य नंतर. या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. त्यांच्या वादाबाबतच्या बातम्या वाचून मलाच हसू आवरत नाही. या दोघांमध्ये एवढं चांगलं ताळमेळ आहे आणि संघाच्या भविष्याच्या दृष्टीनं ही दोघं एकमेकांशी नेहमी संवाद साधत असतात. तुम्ही माझ्या जागी असता तर ही दोघं एकत्र कसं काम करत आहेत, हे पाहून तुम्हालाही आनंद झाला असता. ही दोघं एक संघ आणि कुटूंबासारखे काम करत आहेत.