आज दिवसभर विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा ( Virat Kohli vs Rohit Sharma ) असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराट कोहली नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यात त्याचा फोन बंद असल्याचे वृत्त झळकले, दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी विराटनं टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभाग न घेतल्यानं चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. त्यात विराटनं आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार नसल्याचे वृत्त TOIनं देताच एकच खळबळ उडाली.
मात्र, बीसीसीआयनं या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विराट व रोहित हे टीम इंडियाचे दोन सुपरस्टार आहेत आणि त्यांच्यातील वाद हे संघासाठी मारक ठरणारे आहेत. त्यात या वादांच्या चर्चांमुळे नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची डोकेदुखी वाढली आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन आता बीसीसीआय हा वाद कायमचा क्लोज करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याचा फैसला केला जाईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport शी बोलताना सांगितले की,'' वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानं विराट कोहली नक्कीच नाराज झाला आहे. तो कुटुंबियांना वेळ देण्याचं कारण सांगत असला तरी कुणीही इतकं भोळं नक्कीच नाही.''
''दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर दोन्ही कर्णधारांना समोरासमोर घेऊन चर्चा करणार आहोत आणि पुढे जाण्यासाठी काय करता येईल, यावर तोडगा काढणार आहोत. विराटला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून काढणे, हा संघहिताचा निर्णय आहे आणि विराटनं त्याकडे स्वार्थीपणे पाहू नये. त्याचे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदान अमुल्य आहे आणि तो नेहमीच स्वतःपेक्षा संघाला पुढे ठेवत आला आहे. जे काही घडतंय ते दुर्दैवी आहे,''असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले.
ते पुढे म्हणाले,''या कारणास्तव संघाला फटका बसू नये, हे महत्त्वाचे आहे. विराट व रोहित हे दोन सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यांना सोबत चालावे लागेल आणि ते तसे करतील.''